Sangli News: राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचा जागर, सेनेला शह देण्याची खेळी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 12:16 PM2023-03-25T12:16:15+5:302023-03-25T12:16:47+5:30

भाजपची ताकद वाढविण्याचा प्रयत्न सुरू

BJP Jagar in NCP stronghold, a ploy to give Sena a boost | Sangli News: राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचा जागर, सेनेला शह देण्याची खेळी

Sangli News: राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचा जागर, सेनेला शह देण्याची खेळी

googlenewsNext

अशोक पाटील

इस्लामपूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ‘एकला चलो’ची भूमिका घेतली आहे. याउलट लोकसभा प्रवास योजना २०२४ च्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर, शिराळा मतदारसंघात भाजपने जागर सुरू केला आहे. त्यामुळे सहयोगी पक्ष असलेल्या शिवसेनेने आपला सवतासुभा मांडला आहे.

रयत क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत, भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपुरातील ज्येष्ठ माजी नगरसेवक विक्रम पाटील, राहुल महाडिक, शिराळा मतदारसंघातील सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक यांनी राष्ट्रवादीला अर्थात प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, आ. मानसिंगराव नाईक यांना शह देण्यासाठी इस्लामपूर आणि शिराळा मतदारसंघात भाजपचा जागर सुरू केला आहे. यामध्ये हुतात्मा संकुलाचे गौरव नायकवडीही सामील आहेत.

इस्लामपूर मतदारसंघातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार स्वबळावर जिल्ह्यात खिंड लढवत आहेत. वळवाच्या पावसाप्रमाणे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने या दोन मतदारसंघांशी संपर्क ठेवून आहेत. हातकणंगले मतदारसंघातून माजी खासदार राजू शेट्टी यांनी निवडणुकीअगोदरच आपली उमेदवारी जाहीर केली आहे. तर धैर्यशील माने पुन्हा इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवार नाहीत.

भाजपने कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ताकद वाढविण्यासाठी लोकसभा प्रवास योजनांतर्गत पक्षाची बांधणी सुरू केली आहे. झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील हवा आणि येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीतील राजकीय समिकरणे वेगळ्या वळणावर गेली आहेत. राजू शेट्टी यांच्या विरोधात कोण?, यावर भाजप आणि शिवसेनेमध्ये एकमत नाही.

नेते लागले कामाला

आ. जयंत पाटील आणि आ. मानसिंगराव नाईक यांच्याविरोधात खमके नेतृत्व नाही. म्हणूनच शिराळ्यात सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक, इस्लामपुरात सदाभाऊ खोत, राहुल महाडिक, विक्रम पाटील एकत्रित येऊन भाजपची ताकद वाढविण्याचा प्रयत्न सुरू केला असून, त्यांना रयत क्रांती शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी साथ देण्याचे ठरविले आहे. एकंदरीत इस्लामपूर, शिराळा मतदारसंघात आजही राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अबाधित आहे. म्हणूनच भाजपने या मतदारसंघावर आपले लक्ष्य केंद्रीत केले आहे.

Web Title: BJP Jagar in NCP stronghold, a ploy to give Sena a boost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.