भाजप, जनसुराज्यला पक्षवाढीचे आव्हान; : पक्षांना अपेक्षित यश नाही; जनसुराज्यच्या राजकारणाकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 12:17 AM2019-11-02T00:17:13+5:302019-11-02T00:20:06+5:30

शिवसेनेचे उल्हास पाटील यांच्या उमेदवारीला भाजपमधील काही नेत्यांनी थेट विरोध केला होता. बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांतील झालेला हा वाद थेट ‘मातोश्री’वर जाऊन पोहोचला होता. मात्र, त्याला खूप उशीर झाला होता.

BJP, JanaSuraj challenge partisanship | भाजप, जनसुराज्यला पक्षवाढीचे आव्हान; : पक्षांना अपेक्षित यश नाही; जनसुराज्यच्या राजकारणाकडे लक्ष

भाजप, जनसुराज्यला पक्षवाढीचे आव्हान; : पक्षांना अपेक्षित यश नाही; जनसुराज्यच्या राजकारणाकडे लक्ष

Next
ठळक मुद्देशिरोळ विधानसभा मतदारसंघ

संदीप बावचे।
जयसिंगपूर : शिरोळ विधानसभा निवडणुकीत जनसुराज्य पक्षाला चौथ्या क्रमांकाची मते मिळाली असली तरी १५ वर्षांनंतर जनसुराज्यच्या माध्यमातून लढविलेली ही निवडणूक पक्षाला बळ देणारी ठरली आहे. भाजपला सोडचिठ्ठी देऊन अनेक कार्यकर्त्यांनी जनसुराज्य पक्षाचा झेंडा हाती घेतला. विधानसभा निवडणुकीत पक्षाला अपयश मिळाले असले, तरी पक्षाची नव्याने पेरणी या निमित्ताने झाली आहे. त्यामुळे जनसुराज्य पक्षातील नेत्यांसमोर पक्षवाढीचे आव्हान असून, आगामी राजकारणाची दिशा कशी ठरते, यावरच पक्षाचे देखील भवितव्य ठरणार आहे.

शिवसेनेचे उल्हास पाटील यांच्या उमेदवारीला भाजपमधील काही नेत्यांनी थेट विरोध केला होता. बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांतील झालेला हा वाद थेट ‘मातोश्री’वर जाऊन पोहोचला होता. मात्र, त्याला खूप उशीर झाला होता. भाजपचे नेते व ‘गोकुळ’चे संचालक अनिलकुमार यादव यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत जनसुराज्य पक्षाचा झेंडा हाती घेतला. यादव यांच्या उमेदवारीतून शिवसेना विरोधात बंडखोरी स्पष्ट झाली होती. शिरोळ विधानसभा निवडणूक जनसुराज्य पक्षामुळे चौरंगी झाली. शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड याठिकाणी पक्षाने घेतलेल्या जाहीर सभांनी गर्दीचा उच्चांक देखील मोडला होता. मात्र, निकालानंतर त्याचे रूपांतर मतात दिसून आले नाही. यादव यांच्या निमित्ताने १५ वर्षांनंतर जनसुराज्य पक्षाच्या माध्यमातून भाकरी परतण्याचे आवाहन पक्षाचे प्रमुख विनय कोरे यांनी जयसिंगपूर येथील सभेत केले होते. शिवाय कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी या निवडणुकीत उल्हास पाटील यांना पाडणार हा केलेला दावा देखील यशस्वी करून दाखविला.

निवडणुकीत डांगे यांच्याबरोबरच जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक-निंबाळकर यांनी विरोधी उमेदवारांवर टीकेची झोडदेखील उठविली होती. निवडणुकी दरम्यान घेण्यात आलेल्या जयसिंगपूरच्या सभेत ‘तुमचं काय चुकलं’ हे सांगणाऱ्या निंबाळकर यांना देखील मतदारांनी यड्रावकर हेच बरोबर आहेत, अशी मतपेटीतून मतदारांनी चपराक दिली. बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून मतदारांनी यादव यांना स्वीकारले नसल्याचे आणि नेत्यांची बेरजेची गणिते चुकल्याचे दिसून आले. १५ वर्षांनंतर विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जनसुराज्य पक्षाने भाजपच्या मदतीने शिरोळच्या राजकीय पटलावर नवीन नेत्यांच्या माध्यमातून पट मांडण्याचा प्रयत्न केला असला, तरी आगामी काळात नव्या नेतृत्वावर पक्षवाढीचे आव्हान असणार आहे. एकूणच विधानसभेचा निकाल नेत्यांना आत्मपरीक्षण करायला लावणारा ठरला असून, आगामी राजकारणाची दिशा कशी ठरते? यावरच नेत्यांचे देखील भवितव्य ठरणार आहे.


भाजपवर थेट आरोप
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे काही नगरसेवक, कार्यकर्ते जनसुराज्य पक्षाच्या प्रचारात दिसले होते. खासदार संजय मंडलिक यांनीही शिवसेनेचे उल्हास पाटील यांचा पराभव होण्यास भाजपची ‘बी’ टीमच कारणीभूत ठरल्याचा थेट आरोप केला आहे. निवडणूक निकालानंतर जनसुराज्य पक्षाच्या प्रचारात दिसलेले पदाधिकारी जनसुराज्य पक्षातच राहणार की पुन्हा भाजपवासी होणार याबाबतही उलटसुलट चर्चा आहे.

Web Title: BJP, JanaSuraj challenge partisanship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.