‘बाजार समिती’साठी भाजप घेणार काँग्रेस विरोधकांची सोबत
By admin | Published: June 26, 2015 12:37 AM2015-06-26T00:37:44+5:302015-06-26T00:37:44+5:30
निवडणूक : ‘भाजप’च्या बैठकीस घोरपडेंची दांडी
मिरज : सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी गुरुवारी दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. खा. संजय पाटील यांच्यासह भाजप आमदारांच्या बैठकीत काँग्रेस विरोधकांना सोबत घेऊन ताकदीने बाजार समिती निवडणूक लढविण्याचा निर्णय झाला. माजी मंत्री अजितराव घोरपडे बैठकीस अनुपस्थित होते.
बाजार समिती निवडणुकीसाठी गुरुवारी ९१ उमेदवारी अर्जांची विक्री झाली. ग्रामपंचायत व भटक्या-विमुक्त गटातून सरदार संपतराव पाटील व बसाप्पा सिद्धाप्पा बेडगे या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
निवडणुकीबाबत मिरजेतील विश्रामगृहात भाजपच्या नेत्यांची बैठक झाली. खा. संजय पाटील, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, आ. विलासराव जगताप, जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, ओंकार शुक्ल यांच्यासह पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते.
बाजार समितीत काँग्रेसला पराभूत करण्यासाठी काँग्रेसच्या सर्व विरोधकांना सोबत घेऊन ताकदीने निवडणूक लढविण्याचा निर्णय बैठकीत झाला.
माजी मंत्री अजितराव घोरपडे यांना विश्वासात घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढविण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
घोरपडे यांना बैठकीस पाचारण करण्यात आले होते. मात्र, ते बैठकीस अनुपस्थित होते. अजितराव घोरपडे काँग्रेसच्या संपर्कात असल्याने भाजपच्या नेत्यांनी त्यांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, घोरपडे यांनी भाजपच्या
नेत्यांना प्रतिसाद दिलेला
नाही. (वार्ताहर)