देशाला लुटून परदेश गाठले तरीही भाजपा नेते दुस-याच पक्षाला लुटारूंची उपमा- पृथ्वीराज पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 07:53 PM2018-02-23T19:53:14+5:302018-02-23T19:53:14+5:30
सांगली : बड्या धेंडांनी बँकांच्या माध्यमातून देशाला लुटून परदेश गाठले तरीही भाजपा नेते दुस-याच पक्षाला लुटारुंची उपमा देत फिरत आहेत. त्यांचे हे स्वच्छ प्रतिमेचे सोंग आता लोकांनी ओळखले आहे, अशी टीका काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी शुक्रवारी एका पत्रकाद्वारे केली.
सांगली : बड्या धेंडांनी बँकांच्या माध्यमातून देशाला लुटून परदेश गाठले तरीही भाजपा नेते दुस-याच पक्षाला लुटारुंची उपमा देत फिरत आहेत. त्यांचे हे स्वच्छ प्रतिमेचे सोंग आता लोकांनी ओळखले आहे, अशी टीका काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी शुक्रवारी एका पत्रकाद्वारे केली.
भाजपाच्या युवा नेत्या पूनम महाजन यांनी नुकताच सांगली दौरा केला.
यावेळी त्यांनी कॉंग्रेसला देशाचे लुटारू म्हणून संबोधले होते. या टीकेचा समाचार घेताना पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे की, भाजपामध्ये सहभागी झालेल्या आणि व्यासपीठावर बसलेल्या काही लोकांचा आढावा महाजन यांनी घेतला असता तरी त्यांनी अशा प्रकारची टीका केली नसती. ललित मोदी, नीरव मोदी यांनी देशाला करोडो रुपयांचा चुना लावून परदेश गाठले. त्यांना भाजपानेच अभय दिल्याचे चित्र आहे. अमित शाहांच्या पुत्राचीही चौकशी भाजपा सरकारने केली नाही. ना खाऊंगा, ना खाणे दुंगा अशी गर्जना करीत सत्तेवर आलेल्या भाजपाने आजवर अनेकांना खाऊ घातले. लुटीच्या घटना समोर आल्यानंतर या सर्वांना परदेशी जाताना भाजप नेते पाहत बसले. तरीही यांना देशाचे लुटारू विरोधी पक्षच वाटत आहेत. सांगलीत युवा परिषद घेऊन पक्षाच्या धोरणांचा गाजावाजा करणा-या पूनम महाजन यांनी किमान सांगलीत किती रोजगार उपलब्ध करून दिला, त्याची माहिती तरी जनतेला द्यायला हवी होती.
तरुणांना बेरोजगार करून युवा मेळावे घेण्यासारखी हास्यास्पद गोष्ट नाही. सत्तेवर येताच प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख रुपये ठेवण्याचे दिलेले आश्वासन गेले कुठे? येणारे हे पैसे नेमके गेले तरी कुठे, याचा खुलासा भाजप नेत्यांनी करावा. शेतकºयांच्या मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या आत्महत्या, बेरोजगार तरुणांच्या आत्महत्या, व्यावसाय, उद्योजकांचे सुरू असलेले हाल या गोष्टींना भाजपच जबाबदार आहे. कधी नव्हे इतकी मंदी आणि आर्थिक टंचाई देशाने पाहिली तीसुद्धा भाजपच्या कृपेनेच. त्यामुळे कितीही स्वच्छत प्रतिमेचे सोंग आणले तरी जनता आता त्यास फसणार नाही, असे पाटील यांनी म्हटले आहे.
महापालिकेत झेंडा कॉंग्रेसचाच
कितीही आटापीटा केला तरी महापालिकेत कॉंग्रेसचाच झेंडा फडकणार आहे. सध्यस्थितीत उमेदवारही नसलेल्या भाजपचा कॉंग्रेसच्याच नगरसेवकांवर डोळा आहे. त्यामुळे आयात उमेदवारांवर भाजपने सत्तेचे स्वप्न बघू नये, असे पाटील यांनी म्हटले आहे.