Sangli- नात्याला कलंक!, बहिणीचा विनयभंग करणाऱ्या भाजप नेत्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 04:19 PM2023-08-31T16:19:04+5:302023-08-31T16:23:20+5:30
सोशल मीडियावर बनावट खाते तयार करून केली बदनामी
आटपाडी : आटपाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती रुपेश पाटील यांनी नात्याने बहिण लागणाऱ्या राजकीय पक्षातील पदाधिकारी महिलेचे सोशल मीडियावर बनावट खाते तयार करून बदनामी केल्याची घटना घडली आहे. आटपाडी पोलिस ठाण्यात पाटील यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी रात्री त्यांना अटक केली. बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता जामीन मंजूर करण्यात आला आहे.
दरम्यान, यासंदर्भात फिर्यादी महिलेने पत्रकार परिषदेत संशयित रुपेश पाटीलसारख्या पदाधिकाऱ्याला भाजप पाठीशी घालत असल्याचा आरोप केला.
याबाबत त्यांनी सांगितले की, माझ्या व्हॉट्सॲपवर ९ जुलै रोजी एका अनोळखी व्यक्तीने आक्षेपार्ह संदेश पाठवला होता. यावेळी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने सोशल मीडियावरील एका वापरकर्त्यांने मोबाइल नंबर देऊन अश्लील व आक्षेपार्ह बोलण्यास सांगितले होते, असे सांगितले. सोशल मीडियावरील वापरकर्त्या विरुद्ध सांगली सायबर शाखेकडे तक्रार दाखल केली होती. सायबर शाखेने तपास केला असता सोशल मीडियावरील वापरकर्ता हा आटपाडी येथील रुपेश पाटील असल्याचे निष्पन्न झाले. सोमवारी त्याच्याकडील मोबाइल संच पोलिसांनी ताब्यात घेत मोबाइलची तपासणी केली. तेव्हा त्याच्या मोबाइलवरच ते बनावट खाते असल्याचे सिद्ध झाले.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित रुपेश पाटील यास मंगळवारी अटक केली. बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी दिली. त्यानंतर जामीन मंजूर करण्यात आला.
नात्याला कलंक
त्या म्हणाल्या, रुपेश पाटील नात्याने भाऊ लागतो. पवित्र असा रक्षाबंधनाचा सण आज आहे. बहिणीच्या नात्यामध्ये रक्षण करण्याचे बंधन म्हणून सण साजरा केला जातो. परंतु त्याने केलेले कृत्य संपूर्ण स्त्री जातीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रकार आहे.
भाजपने कारवाई करावी
तक्रारदार महिलेने सांगितले की, रुपेश पाटीलने अन्य काही लोकांना सोशल मीडियावरून माझा मोबाइल नंबर दिला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्याबाबत तपास व्हावा. भाजप पक्षाने त्याच्यावर कारवाई करावी.