सामान्य मेंढपाळांच्या हस्ते आम्ही अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे उद्घाटन करणार- गोपीचंद पडळकर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 12:50 PM2022-03-25T12:50:16+5:302022-03-25T12:50:42+5:30
राष्ट्रवादीच्यावतीने २ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या हस्ते या स्मारकाचं उद्घाटन होणार आहे.
सांगली- सांगलीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचा वाद चिघळला आहे. याचदरम्यान पुन्हा राष्ट्रवादी विरुद्ध भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर असा संघर्ष निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादीच्यावतीने २ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या हस्ते या स्मारकाचं उद्घाटन होणार आहे. मात्र शरद पवार यांच्या हस्ते होणाऱ्या या उद्घाटन सोहळ्याला गोपीचंद पडळकर यांनी विरोध केला आहे. यानंतर अनुचि प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने स्मारक परिसरात संचारबंदी देखील लागू केली आहे.
अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे उद्घाटन सामान्य मेंढपाळांच्या हस्ते आम्ही करणार असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले. मला जेलमध्ये टाकले तरी चालेल, पण कोणत्याही परिस्थितीत आम्ही रविवार दिनांक २७ मार्च अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे उद्घाटन करणार असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केले आहे.
दरम्यान, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने विजयनगर इथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक उभारलं आहे. अडीच कोटी रुपये खर्च करुन हे स्मारक बांधण्यात आलं आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून स्मारकाचं लोकार्पण रखडलं होतं. अखेर यंदा महापालिकेने शरद पवार यांच्या हस्ते २ एप्रिल रोजी स्मारकाचं लोकार्पण करण्याचं निश्चित केलं आहे. मात्र आमदार गोपीचंद पडळकर यांनी २७ मार्च रोजी स्मारकाचं लोकार्पण करण्याचा इशारा दिला.