भाजप नेत्या नीता केळकर यांच्या पुत्राची ३६ लाखांची फसवणूक, हरयाणातील पाच जणांविरोधात सांगलीत गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 12:20 PM2024-09-23T12:20:39+5:302024-09-23T12:21:26+5:30
पैसे घेऊनही वाहनांचे सुटे भाग पुरविले नाहीत
सांगली : दुचाकीचे सुटे भाग न पुरविता सांगलीतील वितरकाची ३६ लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी गुरुग्राम (हरयाणा) येथील पाच जणांविरोधात संजयनगर पोलिसांत गुन्हा दाखल झालाआहे. सारंग श्रीरंग केळकर (वय २८, रा. राजनगर, चिंतामणीनगर, सांगली) यांनी फिर्याद दिली. भाजप नेत्या नीता केळकर यांचे ते सुपुत्र आहेत.
जितेंद्र शर्मा, रूपाली शर्मा, राजेश शर्मा, अभिमन्यू बादल, विकास रात्रा (सर्व मूळ रा. काॅर्पोरेट कार्यालय, गेरगाव, सध्या रा. एअर इंडिया कार्यालयाशेजारी, गुरुग्राम, हरयाणा), अशी संशयितांची नावे आहेत. फसवणुकीचा प्रकार ५ मार्च २०२१ ते २० जानेवारी २०२४ या कालावधीत घडला. सारंग केळकर हे विद्युत दुचाकींचे सांगलीतील वितरक आहेत. माधवनगर रस्त्यावर त्यांचे शोरूम होते. त्यासाठी ते संशयितांकडून वाहने आणि त्यांचे सुटे भाग खरेदी करीत होते. वाहनांसाठी त्यांनी संशयितांच्या ओकिनावा ऑटोटेक या कंपनीकडे दोन लाख रुपये सुरक्षा ठेव ठेवली होती. सुट्या भागांसाठी ३ लाख १३ हजार ३११ रुपये भरले होते. दुचाकी खरेदीसाठी २२ लाख ६७ हजार रुपये भरले. संशयितांनी त्यासाठी वेगवेगळ्या बँक खात्यांचे क्रमांक दिले होते. त्यावर सारंग केळकर यांनी वेळोवेळी पैसे भरले.
दरम्यान, सांगलीत विक्री झालेल्या काही दुचाकींचे सुटे भाग ग्राहकांना केळकर यांनी स्वत:च्या खर्चाने दिले. ही रक्कम सुमारे ८ लाख ६ हजार ३७४ रुपये होते. हे सर्व पैसे कंपनीकडून मिळावेत, पैसे भरल्यानुसार वाहनांचे सुटे भाग व दुचाकी मिळाव्यात यासाठी त्यांनी कंपनीकडे वारंवार पाठपुरावा केला; पण संशयितांनी दाद दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. फसवणुकीचा एकत्रित आकडा ३५ लाख ८६ हजार ६८५ रुपये होतो. पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हे दाखल केले.