भाजपा नेते खालच्या पातळीवरचं राजकारण करतात- पृथ्वीराज पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2018 09:08 PM2018-01-02T21:08:58+5:302018-01-02T21:12:43+5:30
सांगली : जयंत पाटील यांच्या आर्इंचे निधन झाल्यानंतर त्यांच्या घरी जाऊन सांत्वन करणा-या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अवघ्या काही तासांतच जयंतरावांवर टीका केली.
सांगली : जयंत पाटील यांच्या आर्इंचे निधन झाल्यानंतर त्यांच्या घरी जाऊन सांत्वन करणा-या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अवघ्या काही तासांतच जयंतरावांवर टीका केली. इतक्या खालच्या पातळीवरचे राजकारण भाजपा नेत्यांनी सुरू केले आहे, अशी टीका कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.
चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सांगलीतील एका कार्यक्रमात महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकताना जयंत पाटील आणि पतंगराव कदम यांच्यावर टीका केली होती. या टीकेचा समाचार पृथ्वीराज पाटील यांनी घेतला. ते म्हणाले की, ज्यांना जनतेमधून निवडून येता आले नाही, त्यांनी जयंत पाटील आणि पतंगराव कदम यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांवर टीका करू नये. जयंत पाटील यांच्या घरी सांत्वनाला जाऊन आल्यानंतर किमान त्यांच्याबद्दल तरी काही न बोलण्याचे पथ्य त्यांनी पाळायला हवे होते, मात्र त्यांना जयंतरावांच्या घरच्या सुतकाचेही भान राहिले नाही. अशाप्रकारचे राजकारण वरिष्ठ पदाचे मंत्री म्हणून त्यांना शोभत नाही.
पदवीधर मतदारसंघात ते अन्य पक्षांच्या कुबड्या घेऊनच निवडून आले हे जगजाहीर आहे. उलट डॉ. कदम व जयंत पाटील या दोन्ही नेत्यांनी ३0 ते ३५ वर्षे आमदार, मंत्री म्हणून काम केले आहे. त्यांना मतदारसंघ बघा म्हणण्याइतपत तुम्ही मोठे झाला नाहीत. कोल्हापुरात तुमच्या होम पिचवरच महापालिका, विधान परिषद निवडणुकीत तुम्हाला काँग्रेसने धूळ चारली हे विसरला का? सर्वपक्षीय आघाडी करूनही तुम्ही तोंडघशी पडलात. सांगलीचे पाणी तुम्हाला पचणार नाही.
पाटील म्हणाले, गुजरात निवडणुकीच्या निकालाने भाजपची अवस्था ह्यबाल बाल बचेह्ण अशी आहे. त्यामुळे मोदी लाट आता संपली आहे. तुमचे इनकमिंग बंदच झाले आहे. आताही महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीतून नाराज उमेदवारीवर तुम्ही सत्तेची स्वप्ने पाहात आहात, असे ते म्हणाले.
उसन्या उमेदवारांवर उसने अवसान
महापालिका निवडणूक त्यांनी मूळ भाजपवासियांना तिकिट देऊन लढवून दाखवावी. त्यांना उमेदवारही मिळणार नाहीत. केवळ उसन्या उमेदवारांवर विजयाचे उसने अवसान चंद्रकांतदादा आणत आहेत. त्यांची ताकद केवळ आयात उमेदवारांचीच आहे. मूळ कार्यकर्त्यांच्या बळावर त्यांनी पक्षीय ताकद सिद्ध करून दाखवावी, असे आव्हान पाटील यांनी दिले. आतापर्यंत विकासकामांना त्यांनीकधीच वेळ दिला नाही. निवडणुकीसाठी कामे अडवून शहराला वेठीस धरत आहेत, अशी टीका पृथ्वीराज पाटील यांनी केली.