भाजपचे नेते म्हणतात...जयंत पाटील यांच्याशी मित्रत्वाचे संबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 03:02 PM2020-10-28T15:02:57+5:302020-10-28T15:08:05+5:30
politicas, bjp, ncp, Jayant Patil, Muncipal Corporation, Sanglinews महाआघाडीच्या सत्ताकाळात आम्ही पालकमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. त्यांच्याशी प्रेमाचे, मित्रत्वाचे संबंध आहेत. त्याचा फायदा शहराच्या विकासासाठी करून घेऊ, त्यांना लवकरच महापालिकेत बैठकीसाठी निमंत्रण देणार असल्याचे भाजपचे नेते शेखर इनामदार यांनी बुधवारी स्पष्ट केले.
सांगली : महाआघाडीच्या सत्ताकाळात आम्ही पालकमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. त्यांच्याशी प्रेमाचे, मित्रत्वाचे संबंध आहेत. त्याचा फायदा शहराच्या विकासासाठी करून घेऊ, त्यांना लवकरच महापालिकेत बैठकीसाठी निमंत्रण देणार असल्याचे भाजपचे नेते शेखर इनामदार यांनी बुधवारी स्पष्ट केले.
मिरजेतील एका कार्यक्रमात मंत्री पाटील यांनी शेखर इनामदार व मकरंद देशपांडे यांचे आपल्यावर विशेष प्रेम असल्याचे जाहीर केले होते. यामुळे महापालिकेत राष्ट्रवादी व भाजप एकत्र येणार, पुन्हा जयंत जनता पार्टी (जेजेपी)चा प्रयोग होणार अशी चचा रंगली होती. यासंदर्भात इनामदार यांना विचारता त्यांनीही जयंत पाटील यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याची कबुली दिली.
ते म्हणाले की, पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी बारा वर्षापासून संबध आहे. महाआघाडीच्या सत्ताकाळात आम्ही एकत्र काम केले आहे. आमच्यातील मित्रत्वाचे संबंध शहराच्या विकासाआड येणार नाही. जयंत पाटील हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. महापालिकेचे काही प्रश्न शासनदरबारी प्रलंबित आहेत. ते सोडविण्यासाठी त्यांची मदत घेऊ.
महापूर, कोरोनामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती अतिशय बिकट झाली आहे. त्यामुळे शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळवण्यासाठी त्यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. त्यांना महापालकेत निमंत्रीत करून शासनाकडील प्रलंबीत कामांचा आढावा व आर्थिक अडचणींबाबत चर्चा करणार असल्याचे इनामदार आहे.
राजकीय भूमिका वेगळ्या
जयंत पाटील यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध असले तरी आमच्या पक्षीय व राजकीय भूमिका वेगवेगळ्या आहेत. महाआघाडीच्यावेळी राजकीय संदर्भ वेगळे होते. आता त्यात बदल झाला आहे. विकासकामात आम्ही राजकारण आणत नाही. नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजेत, याच भूमिकेतून आम्ही काम करतो. यात काही गैर नाही, असेही इनामदार यांनी स्पष्ट केले.