Sangli Politics: वाळवा-शिराळ्यात भाजप नेत्यांची मांदीयाळी, जयंत पाटील यांच्या विरोधात बोलण्यास मौन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 18:23 IST2025-03-03T18:20:58+5:302025-03-03T18:23:01+5:30
तरीही त्या रस्त्याला जाणार नाही

Sangli Politics: वाळवा-शिराळ्यात भाजप नेत्यांची मांदीयाळी, जयंत पाटील यांच्या विरोधात बोलण्यास मौन
अशोक पाटील
इस्लामपूर : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर इस्लामपूर व शिराळा विधानसभा मतदारसंघात कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपच्या दिग्ग्ज नेत्यांची वर्दळ वाढली आहे. मात्र, आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात या नेत्यांनी बाळगलेले मौन राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे. दोन्ही मतदारसंघातील राजकीय हालचालीतून नेमके कशाचे संकेत मिळत आहेत, यावरुन तर्कवितर्क लढविले जात आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात इस्लामपूर मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एंट्रीने जयंत पाटील यांच्यापुढे आव्हान उभे केले होते. तरीसुद्धा जयंत पाटील विजयी झाले. परंतु, मतांचा टक्का चांगलाच घसरला. याऊलट शिराळा मतदारसंघात भाजपने सत्यजित देशमुख यांच्या रूपाने बाजी मारली. मानसिंगराव यांचा पराजय जयंत पाटील यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. मतदारसंघात भाजपने आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
शिराळा मतदारसंघात वाळवा तालुक्यातील ४८ गावे येतात. याठिकाणी जयंत पाटील यांचेच वर्चस्व आहे. त्यांना धक्का देण्यासाठी नुकतेच निवडून आलेले सत्यजित देशमुख यांच्यासह आमदार सदाभाऊ खोत, राहुल महाडिक, सम्राट महाडिक आणि जयराज पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला धक्का देत भाजप मजबूत करण्यासाठी सभासद नोंदणी जोमाने सुरू केली आहे. बैलगाडा शर्यतीच्या निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, गोपीचंद पडळकर यांना आमंत्रित केले होते. परंतु, या नेत्यांनी जयंत पाटील यांच्या विरोधात ‘ब्र’ शब्दही काढला नाही.
तरीही त्या रस्त्याला जाणार नाही
गेल्या आठवडाभरात आमदार जयंत पाटील यांच्या भूमिकेविषयी सोशल मीडियावर विविध चर्चा होऊ लागली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत पाटील यांची गळाभेट झाली असली तरीही आपण त्या रस्त्याला नाहीच अशीच भूमिका जयंत पाटील यांनी सोशल मीडियावर घेतली आहे.