Vidhan Parishad Election: विधान परिषदेचा पत्ता कापल्याने भाजपचे नेते अस्वस्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 01:07 PM2022-06-09T13:07:36+5:302022-06-09T13:08:30+5:30
वाळवा, शिराळ्यातील भाजपच्या काही नेत्यांनी मोर्चेबांधणी केली होती. परंतु पक्षाने पत्ता कापल्याने या नेत्यांचा भ्रमनिरास झाला आहे.
अशोक पाटील
इस्लामपूर : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील यांना शह देण्यासाठी विधान परिषदेवर जाण्यासाठी वाळवा, शिराळ्यातील भाजपच्या काही नेत्यांनी मोर्चेबांधणी केली होती. परंतु पक्षाने पत्ता कापल्याने या नेत्यांचा भ्रमनिरास झाला आहे.
विधानसभेच्या इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील यांचा गट बळकट आहे. शिराळा मतदारसंघात आ. मानसिंगराव नाईक व नुकतेच राष्ट्रवादीत आलेले माजी मंत्री शिवाजीराव नाईक, भाजपचे सत्यजित देशमुख, राहुल महाडिक, सम्राट महाडिक या नेत्यांचे गट सक्रिय आहेत. त्यात रयत क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची भर पडली आहे.
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले विकास आघाडीचे माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील यांच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. मागील निवडणुकीत भाजपची उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांनी बंडखोरी केली होती. त्यानंतर पुन्हा पक्षबांधणीला सुरुवात केली होती. विधान परिषदेवर जाण्यासाठी जोरात मोर्चेबांधणी करूनही त्यांना उमेदवारी मिळाली नाही. सदाभाऊ खोत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पुन्हा विधान परिषदेवर जाण्यासाठी ताकद पणाला लावली होती. परंतु त्यांच्याही पदरात काही पडले नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांत नाराजीचा सूर उमटत आहे.
भाजपने यापूर्वी सत्यजित देशमुख, राहुल महाडिक, सम्राट महाडिक यांनाही आश्वासने दिली आहेत. परंतु ती हवेत विरली आहेत. विधान परिषदेचा पत्ता कापल्याने सम्राट महाडिक यांच्या पदरीही निराशा आली आहे.
सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांचे नेते आहेत. त्यांना यावेळी संधी मिळण्याची शक्यता होती. परंतु उमेदवारी देणे हा भाजपमधील वरिष्ठ नेत्यांचा निर्णय आहे, तो स्वीकारला पाहिजे. भविष्यात वाळवा, शिराळ्याला भाजपकडून न्याय मिळेल, अशी अपेक्षा. - सम्राट महाडिक, राज्य कार्यकारिणी सदस्य, भाजप