आयारामांमुळे होतोय भाजपचा पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:28 AM2020-12-06T04:28:33+5:302020-12-06T04:28:33+5:30
सांगली : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मनमानी कारभारामुळे राज्यभरात पक्षांतर्गत नाराजी आहे. आयारामांमुळेच ...
सांगली : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मनमानी कारभारामुळे राज्यभरात पक्षांतर्गत नाराजी आहे. आयारामांमुळेच विधानपरिषदेच्या निवडणुकीत पक्षाचे नुकसान झाले, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते वि. द. बर्वे यांनी केला.
यासंदर्भातील पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, राज्यात भाजपचा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील पराभव लाजीरवाणा आहे. मूळ भाजप कार्यकर्ते सतरंज्या घालायला आणि सत्तेची पदे आयारामांना, असा कारभार सुरू आहे. यास चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहे. मूळ भाजप, संघ परिवाराच्या परिश्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री तथा भाजपचे माजी अध्यक्ष अमित शहा यांच्या कल्पक नेतृत्वामुळे देशात दोनवेळा व महाराष्ट्रात एकदा भाजपला सत्तेची संधी मिळाली. यात संघ, विद्यार्घी परिषद, भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनी पायाचे दगड होऊन जिवाचे रान केले. त्यावरच भाजपला सत्तासिंहासन काबीज करता आले. पण सत्ता येताच फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी जुन्या कार्यकर्त्यांना कस्पटासमान समजत डावलले. त्याऐवजी काँग्रेस-राष्ट्रवादीतून सत्तेसाठी आलेल्या आयारामांना मात्र यांनी पायघड्या घालत आमदार, खासदार आणि इतर पदे देण्याचा सपाटाच लावला.
भाजप विद्यार्थी परिषद वाढावी म्हणून मी एकेकाळी काम करीत होतो. मोर्चे काढले, यातून माझ्यावर गुन्हेही दाखल झाले. त्याची भाजपमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांना जाणीव आहे. पण भाजपची संस्कृती विसरून सत्तेचा बाजारच झाला आहे.