भाजपविरुद्ध भाजपचा सामना! निष्ठावंत भाजपवाले चंद्रशेखर बावनकुळेंनाच घेराव घालणार; सांगलीतील बैठकीत निर्णय
By अविनाश कोळी | Published: October 15, 2022 08:08 PM2022-10-15T20:08:56+5:302022-10-15T20:10:05+5:30
निष्ठावंत गटातील सुमारे २०० नाराज भाजप कार्यकर्ते येत्या काही दिवसांत पक्षाच्या प्रदेश कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली: जिल्ह्यातील निष्ठावंत गटातील सुमारे २०० नाराज भाजप कार्यकर्ते येत्या काही दिवसांत पक्षाच्या प्रदेश कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत. त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही घेराव घालण्याचा निर्णय शनिवारी या गटाच्या बैठकीत घेण्यात आला.
सांगलीच्या टिळक स्मारक मंदिरात शनिवारी भाजपच्या निष्ठावंत गटाची बैठक पार पडली. ज्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात भाजपचे बीज रोवून रोपटे वाढविले, त्या निष्ठावंत व तळागाळातील भाजपा कार्यकर्त्यांना सध्या जिल्ह्यातील भाजप नेते गृहित धरत नाहीत. जिल्ह्यासह प्रदेशातील नेतृत्व जाणून-बुजून अशा कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
गेल्या अनेक दिवसांपासून हे निष्ठावंत कार्यकर्ते बैठका घेऊन आपली भूमिका मांडत असूनही जिल्हा अथवा प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे पक्षाच्या प्रदेश कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. भाजपाचा मूळ निष्ठावंत कार्यकर्ता बाहेर फेकला जात असल्याचे दुःख सलत असल्यानेच, आंदोलनाचा निर्णय घेतल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
आंदोलनादरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना घेराव घालून जोरदार निदर्शने करण्याचा इशाराही या बैठकीदरम्यान देण्यात आला. सांगली जिल्ह्यात येणाऱ्या प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांसह मंत्र्यांनाही काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. त्यापूर्वी शेकडो कार्यकर्त्यांच्या सह्यांचे निवेदन प्रदेश कार्यकारणीकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एवढे करूनही प्रदेश कार्यकारिणीला जाग येत नसेल तर, पुन्हा एकदा भारतीय जनसंघाची स्थापना करावी लागेल, असा इशाराही निष्ठावंत गटाने दिला.
बैठकीत प्रताप पाटील, प्रदीप वाले, डॉक्टर योगेश लाड, विनायक खरमाटे ,अॅड. श्रीपाद अष्टेकर, भारत निकम, संजय हिरेकर, संजय कोरे, भगवान पाटील, सुरेश कोरे आदी उपस्थित होते .
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"