सत्तेसाठी भाजप महाडिकांच्या दारात

By admin | Published: February 24, 2017 11:56 PM2017-02-24T23:56:02+5:302017-02-24T23:56:02+5:30

राजू शेट्टीही दूरच; अजितराव घोरपडे दोन दिवसांत निर्णय घेणार; राजकीय हालचालींना वेग

BJP Mahadik's door to power | सत्तेसाठी भाजप महाडिकांच्या दारात

सत्तेसाठी भाजप महाडिकांच्या दारात

Next



सांगली : जिल्हा परिषदेच्या निवडणूक निकालानंतर रयत विकास आघाडीचे तीन सदस्य भाजपबरोबर जाण्यास बांधील नसल्याचे राहुल महाडिक यांनी गुरुवारी जाहीर करताच भाजप नेत्यांची झोप उडाली. यामुळे राजकीय हालचालींना वेग आला. महाडिक गटाची समजूत काढण्यात भाजप नेत्यांचा शुक्रवारचा दिवस गेला. खा. राजू शेट्टी यांनीही भाजपपासून फारकत घेतली असून, अजितराव घोरपडे ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ भूमिकेत आहेत.
जिल्हा परिषदेत ६० सदस्य असून, सत्ता स्थापण्यासाठी ३१ सदस्यांची गरज आहे. भाजपकडे २५, राष्ट्रवादी १४, काँग्रेस १०, शिवसेना तीन, रयत विकास आघाडी चार, माजी मंत्री अजितराव घोरपडे गट दोन, अपक्ष एक, स्वाभिमानी शेतकरी संघटना एक असे पक्षीय बलाबल आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी भाजपच्या आणि रयत विकास आघाडीच्या चार, अशा २८ जागा आपल्याकडे असल्याचा दावा केला. मात्र रयत विकास आघाडीत नानासाहेब महाडिक यांचे तीन आणि वैभव नायकवडी गटाचा एक सदस्य आहे. नानासाहेब महाडिक यांचे पुत्र राहुल महाडिक यांनी, आमचे तीन सदस्य भाजपला पाठिंबा देण्यास बांधील नाहीत, जो पक्ष सन्मानाची वागणूक देईल, त्यांना पाठिंबा देणार आहोत, असे जाहीर करून गुरुवारी खळबळ उडवून दिली होती. खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचाही एक सदस्य असून त्यांनीही भाजपबरोबर जाणार नाही, असे जाहीर केले आहे. शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी अद्याप पाठिंब्याचा निर्णय घेतलेला नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. कारण मुंबई महापालिकेतील भाजप-सेना युतीवर बाबर गटाचा निर्णय अवलंबून आहे. या पार्श्वभूमीवर भाजपला जिल्हा परिषदेत सत्ता स्थापण्यात अडथळे येत असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले.
दिवसभरात पृथ्वीराज देशमुख, खासदार संजयकाका पाटील यांच्यासह भाजप आमदारांच्या राजकीय हालचालींना वेग आला. महाडिक गटाची समजूत काढण्यासाठी इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी धाव घेतली होती. महाडिक गटाशी चर्चा करून समजूत काढण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होते.
याबाबत माजी मंत्री अजितराव घोरपडे म्हणाले की, आमच्या गटाचे दोन सदस्य असून कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यायचा, याबद्दल निर्णय झालेला नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम म्हणाले की, आम्ही पराभवाचे चिंतन करीत असून, कोणाला पाठिंबा द्यायचा याबद्दल काहीच निर्णय झालेला नाही.

रयत विकास आघाडीच्या सदस्यांचा सत्कार रद्द
रयत विकास आघाडीच्या नूतन जिल्हा परिषद सदस्यांच्या सत्काराचा कार्यक्रम पेठ (ता. वाळवा) येथे शुक्रवारी होणार होता. याला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार राजू शेट्टी येणार होते, पण ते गैरहजर राहिल्यामुळे कार्यक्रमच रद्द करण्यात आला. यावरून खासदार शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील दरी वाढल्याचे स्पष्ट होत आहे. आघाडीच्या चार सदस्यांचा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका सदस्याचा भाजपला पाठिंबा देण्यात गोंधळ निर्माण झाल्याचे दिसत आहे.

Web Title: BJP Mahadik's door to power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.