भाजपचे सदस्य म्हणतात, महासभा ऑफलाइन घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:26 AM2021-03-05T04:26:31+5:302021-03-05T04:26:31+5:30
सांगली : महापालिकेच्या सत्तेत भाजप असताना महासभा ऑनलाइन घ्यावी की ऑफलाइन यावरून अनेकदा वादविवाद झाले. तेव्हाच्या विरोधी पक्ष काँग्रेस ...
सांगली : महापालिकेच्या सत्तेत भाजप असताना महासभा ऑनलाइन घ्यावी की ऑफलाइन यावरून अनेकदा वादविवाद झाले. तेव्हाच्या विरोधी पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादीने त्यासाठी जोर लावला होता. पण नगरविकास मंत्रालयाने मात्र ऑनलाइन सभा घेण्यास मनाई केली होती. आता सत्ताबदल झाल्यानंतर भाजपचे सदस्य ऑफलाइन सभेसाठी आग्रह धरू लागले आहेत. लवकरच भाजप नगरसेवकांचे एक शिष्टमंडळ नगरविकास सचिवांनाही भेटणार आहे.
कोरोनामुळे गेली वर्षभर महापालिकेची सभा ऑनलाइन घेतली जात आहे. या सभेत सदस्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अनेकदा वाॅर्डातील प्रश्नही मांडता येत नाहीत. रेंजच्या समस्येमुळे संभाषणातही अडथळे येतात. विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी गेल्या चार महिन्यापासून ऑफलाइन सभेसाठी पाठपुरावा सुरू केला होता. पण तत्कालीन सत्ताधारी भाजपने मात्र फारसे गांभीर्याने घेतले नव्हते. जानेवारी महिन्यात या विषयावर बराच गदारोळ झाल्यानंतर प्रशासनाने नगरविकास मंत्रालयाकडे मार्गदर्शन मागविले. नगरविकास सचिवांनी ऑफलाइन सभा घेण्यास मंजुरी दिली नाही. महासभेचे कामकाज ऑनलाइनच घ्यावे, असे आदेश दिले. त्यानंतर दोन महासभा ऑनलाइन झाल्या. आता महापालिकेत सत्ताबदल झाला आहे. महापौरपद राष्ट्रवादीकडे, तर उपमहापौरपद काँग्रेसकडे आहे. त्यामुळे आता भाजपने ऑफलाइन सभेसाठी आग्रह धरला आहे.
याबाबत भाजपचे गटनेते विनायक सिंहासने म्हणाले की, संसदीय कामकाज, विधानमंडळाचे अधिवेशन कोरोनाबाबतची योग्य ती दक्षाता घेऊन सभागृहात होत आहे. जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका, जिल्हा प्रशासनाच्या सभा, बैठकाही ऑफलाइन पद्धतीने होत आहेत. पण महापालिकेची महासभा मात्र ऑनलाइन पद्धतीनेच आयोजित होत आहे. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर मांडणी करीत असताना अनेकवेळा तांत्रिक अडथळे येतात. एखाद्या विषयास लोकप्रतिनिधीचा विरोध असेल तर त्यावर सविस्तर चर्चा न होता घाई गडबडीने मंजूर केला जातो. सामाजिक अंतर ठेवून सभा घेण्याबाबत प्रशासनाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे ऑफलाइन सभेसाठी भाजपकडून पाठपुरावा करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
चौकट
नगरविकास सचिवांना भेटणार
भाजपच्या सर्व नगरसेवकांचे पत्र घेऊन महापालिकेची सभा ऑफलाइन घ्यावी, यासाठी लवकरच नगरसचिवांची भेट घेतली जाणार आहे. त्यांना ऑनलाइन महासभा घेण्यात येणाऱ्या अडचणींची माहिती देऊन ऑफलाइन सभेसाठी पाठपुरावा करणार असल्याचेही सिंहासने यांनी सांगितले.