विधानपरिषदेच्या मोहापायी राजू शेट्टी यांच्या हातात तमाशातील तुणतुणे : आशिष शेलार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 05:14 PM2020-12-24T17:14:37+5:302020-12-24T17:15:36+5:30
येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ रयत क्रांती संघटना व भारतीय जनता किसान मोर्चा यांच्यावतीने क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन किसान आत्मनिर्भर यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
शिरटे (जि. सांगली) :
कृषी विधेयकाचा कायदा शेतकऱ्यांना अधिकार, स्वातंत्र्य व जादाचे पैसे मिळवून देणारा आहे. या कायद्याने देशात व राज्यात नवक्रांती घडून येणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात विधानपरिषदेच्या मोहापायी तमाशातील तुणतुणे हातात घेण्याची वेळ एका शेतकरी नेत्यावर आली आहे, असा टोला माजी खासदार राजू शेट्टी यांचा नामोल्लेख टाळत आमदार आशिष शेलार यांनी लगावला.
येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ रयत क्रांती संघटना व भारतीय जनता किसान मोर्चा यांच्यावतीने क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन किसान आत्मनिर्भर यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार सुरेश हळवणकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, भाजयुमोचे राज्य उपाध्यक्ष राहूल महाडिक, संग्राम महाडिक, सागर खोत, सुनील खोत, सभापती जगन्नाथ माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार आशिष शेलार म्हणाले, या विधेयकाला विरोध करणाऱ्या काही मूठभर लोकांची भावना अडते आणि दलालांचे समर्थन करणारी आहे. केंद्राने आणलेल्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडणार असून देशात आणि राज्यात नवक्रांती घडून येणार आहे. ज्यांच्यात हिम्मत असेल त्यांनी हा कायदा पालटून दाखवावा.
आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, प्रश्न निर्माण करायचे ते तेवत ठेवायचे हे काम कॉँग्रेस-राष्ट्रवादीने केले आहे. आपण शेतकऱ्यांच्या बाजूने की अडते-दलालांच्या बाजूने आहोत हे राज्याच्या नेतृत्वाने स्पष्ट करावे.
माजी आमदार सुरेश हळवणकर यांनीही मनोगत व्यक्त केले. भाजयुमोचे राज्य उपाध्यक्ष, यात्रेचे संयोजक राहूल महाडिक यांनी स्वागत केले. डॉ. सचिन पाटील यांनी आभार मानले. यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे, मकरंद देशपांडे, विक्रम पाटील, कपील ओसवाल, अमित ओसवाल, सतीश महाडीक उपस्थित होते.
दरम्यान, येडेमच्छिंद्र येथील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी हे निशिकांत भोसले-पाटील यांना मानणारे आहेत. त्यामुळे त्यांनी कार्यक्रमाकडे न जाता ग्रामपंचायत कार्यालयातच आमदार आशिष शेलार यांच्यासह मान्यवरांचा सत्कार केला.