शरद पवारांविरोधात पडळकर-खोत आक्रमक, अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याच्या लोकार्पणास विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 05:28 PM2022-03-27T17:28:36+5:302022-03-27T17:31:50+5:30
'सांगली जिल्ह्याशी काही संबंध नसताना शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन नको.'
सांगली: सांगलीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणावरुन गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत आक्रमक झालेले पाहायला मिळाले. या पुतळ्याचे लोकार्पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार होते. त्याला पडळकर आणि खोत यांनी विरोध दर्शवला असून, दोन्ही नेते रस्त्यावर उतरुन जोरदार आंदोलन करत आहेत. दरम्यान, पुतळ्याचे लोकार्पण झाल्याचा दावाही पडळकरांनी केला आहे.
आज सांगलीत पिवळे झेंडे घेऊन भाजप कार्यकर्त्यांनी शहरात पिवळे वादळ आणले आहे. शरद पवरांनी गोरगरिबांची फसवणूक केली, त्यांच्या हस्ते पुतळ्याचे लोकार्पण होऊ नये, अशी आक्रमक भूमिका पडळकरांनी घेतली आहे. तर, सांगली जिल्ह्याशी काही संबंध नसताना शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन नको. आतापर्यंत तुम्ही किती उद्घाटन केली, कंटाळा आला नाही का? असा खोचक सवाल सदाभाऊ खोत यांनी पवारांना केला आहे.
लोकार्पण झाल्याचा पडळकरांचा दावा
दरम्यान, या सर्व गोंधळात पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडल्याचा दावा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्तात पडळकर यांना होळकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करणे शक्य नव्हते, त्यामुळे पडळकरांनी पुन्हा एकदा आपला गनिमीकावा दाखवला आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावर ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी करुन लोकार्पण केल्याचा दावा पडळकर यांनी केला आहे.
काय म्हणाले पडळकर?
लोकाप्रणापूर्वी मीडियाशी संवाद साधताना पडळकर म्हणाले होते की, पुतळ्याचे लोकार्पण आमच्यासाठी ऐतिहासिक क्षण आहे. हा लोकार्पण सोहळा आमच्या मेंढपाळांच्या हस्ते पार पडणार. मात्र अशा मेंढपाळांना सरकार विरोध करून पद मोठी मनं छोटी याचे दर्शन घडवत आहेत, असा हल्लाबोल गोपीचंद पडकर यांनी केला. तसेच, आम्ही पोलिसांना घाबरणार नाही, पोलिसांनी अडवूनही एवढे लोक याठिकाणी पोहोचले, हे उद्घाटन महाराष्ट्र बघेल असे थेट आव्हानही गोपीचंद पडळकर यांनी दिले होते.