भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी विधानसभा निवडणुकीबाबत घेतला मोठा निर्णय, समर्थकांना धक्का

By अविनाश कोळी | Published: September 3, 2024 08:11 PM2024-09-03T20:11:21+5:302024-09-03T20:15:36+5:30

अभंगातून भावना व्यक्त

BJP MLA Sudhir Gadgil has decided to withdraw from the assembly elections in sangli | भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी विधानसभा निवडणुकीबाबत घेतला मोठा निर्णय, समर्थकांना धक्का

भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी विधानसभा निवडणुकीबाबत घेतला मोठा निर्णय, समर्थकांना धक्का

सांगली : सलग दोनदा सांगलीविधानसभा निवडणूक जिंकणारे भाजपचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनी विधानसभा निवडणुकीपासून बाजुला होण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या विजयासाठी प्रयत्न करु, असे गाडगीळ यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. गाडगीळ यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे.

गेल्या वर्षभरापासून गाडगीळ यांचे समर्थक सांगली विधानसभा निवडणुकीची तयारी करीत होते. अचानक निवडणुकीच्या राजकारणापासून माघार घेत असल्याचे गाडगीळ यांनी मंगळवारी जाहीर केले. त्यामुळे त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला. गाडगीळ यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, लवकरच विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. या निवडणुकीसाठी पक्षाकडे उमेदवारी न मागण्याचा निर्णय मी घेतला आहे. राजकारणात कधी तरी थांबावे लागते, या मताचा मी आहे. मला दोनदा विधानसभेची उमेदवारी मिळाली. आता माझ्याऐवजी अन्य कार्यकर्त्याला संधी द्यावी, असे माझे प्रामाणिक मत आहे.

उमेदवारी मागणार नसलो तरी पक्षाचे काम यापुढे करत राहणार आहे. मला उमेदवारी नको, अशी विनंती मी पक्ष नेतृत्वाला केली आहे. माझ्यावर मतदारांनी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी समाधानी आहे.

उमेदवाराला विजयी करणार

सांगली विधानसभेला पक्ष जो उमेदवार देईल त्याचा प्रामाणिकपणे प्रचार करेन. त्याला विजयी करण्यासाठी सर्व प्रयत्न करु, असेही गाडगीळ यांनी म्हटले आहे.

प्रकल्प पूर्णत्वास नेणार

दहा वर्षाच्या कालावधीत अनेक प्रश्न मार्गी लावले. जे प्रकल्प सध्या अपूर्ण आहेत ते पूर्ण करण्यासाठी यापुढे माझे प्रयत्न कायम राहतील. निवडणुकीच्या राजकारणातून थांबत असलो तरी संघटनात्मक कामात सक्रीय राहणार आहे, असे गाडगीळ यांनी स्पष्ट केले.

अभंगातून भावना व्यक्त

‘करुनी अकर्ते होऊनियां गेले, तेणे पंथें चाले तोची धन्य तोची धन्य जनीं पूर्ण समाधानी’ या रामदास स्वामींच्या अभंगाच्या ओळींचा संदर्भ देत गाडगीळ यांनी कारकिर्दीबाबत समाधान व्यक्त केले. माणुसकी जपत, जात-पात, धर्म-पंथ यांचा विचार न करता कामे केल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: BJP MLA Sudhir Gadgil has decided to withdraw from the assembly elections in sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.