काँग्रेसच्या मदतीला भाजपचे आमदार, खासदार

By admin | Published: November 19, 2015 11:36 PM2015-11-19T23:36:38+5:302015-11-20T00:19:03+5:30

महापालिकेत लक्ष : विकासकामासाठी ६२ कोटींचे प्रस्ताव राज्य शासनाकडे; महिन्याभरात निधी येणार

BJP MLAs, MPs to help Congress | काँग्रेसच्या मदतीला भाजपचे आमदार, खासदार

काँग्रेसच्या मदतीला भाजपचे आमदार, खासदार

Next

सांगली : महापालिकेतील सत्तेपासून नेहमीच दूर असलेल्या भाजपने आता सत्ताधारी काँग्रेसला मदतीचा हात देण्याचा निर्धार केला आहे. भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ व खासदार संजयकाका पाटील यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी विकासकामांवर चर्चेसाठी एक पाऊल टाकले आहे. त्याचाच एक भाग म्हणून गाडगीळ यांनी शासनाकडे विकासासाठी ६२ कोटीचा निधीच्या प्रस्ताव दिला आहे. त्यापैकी १५ कोटी रुपये पुढील महिन्यात प्राप्त होतील. स्थायी समितीचे सभापती संतोष पाटील यांनी ही माहिती गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
महापालिकेच्या स्थापनेला १७ वर्षे होत आली. विकास महाआघाडीच्या पाच वर्षाचा काळ वगळता सांगलीवर काँग्रेसचे नेते मदन पाटील यांचेच वर्चस्व राहिले आहे. महाआघाडीत भाजपचा समावेश होता. त्यांच्या पदरी काही पदेही पडली. पण कधीही पालिकेत भाजपची चर्चा झाली नाही. पण शहरातील नागरिकांनी मात्र विधानसभा, लोकसभेला भाजपच्या पारड्यात नेहमीच वजन टाकले आहे.
गेल्या महिन्यात सत्ताधारी काँग्रेसचे नेते मदन पाटील यांचे निधन झाले. त्यामुळे सध्या पालिकेतील नगरसेवकांना त्यांच्या पत्नी जयश्रीतार्इंचाच आधार आहे. त्यात पालिकेच्या विकासाचे आव्हानही पेलावे लागणार आहे. त्यात आता काँग्रेसच्या मदतीला भाजपचे खासदार व आमदार दोघेही धावले आहेत.
आमदार सुधीर गाडगीळ यांनी मध्यंतरी पालिकेत बैठक घेऊन विविध योजनांचा आढावा घेतला होता. तर जिल्हा बँक व बाजार समिती निवडणुकीच्या माध्यमातून संजयकाका व मदनभाऊंचे सूत जुळले होते. आता गाडगीळ यांनी पालिका हद्दीतील विविध विकासकामासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. गुरुवारी स्थायी समितीचे सभापती संतोष पाटील, ज्येष्ठ नगरसेवक हारुण शिकलगार, माजी नगरसेवक हणमंत पवार यांच्याशी त्यांनी चर्चा केली.
शहरातील व गुंठेवारी भागातील रस्ते व इतर कामांसाठी गाडगीळ यांनी ६२ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे दिला आहे. या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळेल आणि महिन्याभरात किमान १५ कोटीचा निधी पालिकेला मिळणार आहे. खुद्द गाडगीळ यांनीही पक्षभेद बाजूला ठेवून शहराच्या विकासासाठी एकत्रित काम करण्याची ग्वाही दिली आहे. महापालिकेच्या माध्यमातून काही चांगली कामे होत असतील तर आणखी निधी मिळून देऊ, असे आश्वासनही त्यांनी दिल्याचे सभापती पाटील यांनी सांगितले.
खा. संजयकाका पाटील यांनी तर गेल्या काही महिन्यांपासून सत्ताधाऱ्यांशी संबंध सुधारले आहेत. एलबीटीप्रश्नी संजयकाका व मदनभाऊंनी एकत्रित निर्णय घेतला होता. आता मदनभाऊंच्या पश्चात त्यांनीही काँग्रेस नगरसेवकांना हात दिला आहे. त्यांच्या खासदार निधीतून काही महिन्यापूर्वी कोट्यवधीची कामे मंजूर केली आहेत.
आता त्यांनी पाणीपुरवठा योजनेसह विविध योजनेच्या निधीचा पाठपुरावा करण्याची हमी दिली आहे. पाणीपुरवठ्याच्या ५६ व ७० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राच्या दरातील तफावतीचा १४ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहेत. मच्छीमार्केटचा साडेतीन कोटीचा, तर काळी खण सुशोभिकरणाचा २९ कोटीचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या दरबारी धुळखात आहे.
या सर्व प्रस्तावाची माहिती खा. पाटील यांनी मागविली आहे. या प्रस्तावाचा ते पाठपुरावा करणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले. भाजपच्या आमदार, खासदारांच्या भूमिकेचे निधीचा प्रश्न काहीअंशी सुटणार आहे. महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेसनेही या भूमिकेचे स्वागत केले आहे. (प्रतिनिधी)

पायाभूत सुविधा : पावणेसात कोटीचा निधी
महापालिका हद्दीतील पायाभूत सुविधा व रस्त्यांच्या कामासाठी राज्य शासनाकडून ६ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती संतोष पाटील यांनी दिली. महापालिकेला दरवर्षी राज्य शासनाकडून पायाभूत सुविधा व रस्ते अनुदान दिले जाते. गेली वर्षभर हे अनुदान मिळाले नव्हते. याबाबत आपण खा. संजयकाका पाटील व आमदार सुधीर गाडगीळ यांना पत्र दिले होते. दोन्ही लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा केला. राज्यातील १६ महापालिकेचे अनुदान थांबले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी अनुदान वाटपाच्या प्रस्तावावर सही केली आहे. सांगलीला रस्ते अनुदानापोटी ३ कोटी ५५ लाख तर पायाभूत सुविधांसाठी ३ कोटी २१ लाख असा ६ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून रस्त्यांसह गटारी, ड्रेनेज व इतर कामे केली जाणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले

Web Title: BJP MLAs, MPs to help Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.