तासगावात ‘करेक्ट कार्यक्रमा’ने कारभारी घायाळ; गटबाजी रोखण्याचे आमदार, खासदारांसमोर आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 02:19 PM2022-12-28T14:19:00+5:302022-12-28T14:19:39+5:30
ग्रामपंचायतीच्या निकालाचा अनुभव पाहता इच्छुकांनी करेक्ट कार्यक्रमाची धास्ती
दत्ता पाटील
तासगाव : गटांतर्गत फितुरीमुळे अनेक गावातील कारभाऱ्यांना पराभव पत्करावा लागला. करेक्ट कार्यक्रमामुळे कारभारी घायाळ झाले आहेत. त्याचे पडसाद जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकीत उमटणार हे नक्की. त्यामुळे गटबाजी रोखण्याचे मोठे आव्हान भाजपचे खासदार संजयकाका पाटील, राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांना पेलावे लागणार आहे.
तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी सत्तांतर पाहायला मिळाले. तासगाव तालुक्यातील २६पैकी तब्बल ११ गावात सत्तांतर झाले. या सत्तांतरात विरोधकांपेक्षा, स्वपक्षातील सहकाऱ्यांचाच मोठा वाटा असल्याची चर्चा आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गावपातळीवरील गटबाजी संपुष्टात आणून ग्रामपंचायतींची सत्ता काबीज करण्यासाठी मोर्चेबांधणी केली होती.
निवडणुकीच्या काळात गटबाजी संपली, असे चित्र दिसत होते. मात्र, निकालानंतर ही गटबाजी वरकरणीच संपल्याचे दिसून आले. गावात प्रबळ गट असूनही अनेक ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवात गटबाजीची किनार असल्यामुळे निकालानंतर ही गटबाजी आणखी तीव्र होताना दिसून येत आहे.
मणेराजुरी, उपळावी, वायफळे, वंजारवाडी, नागाव (नि.), बलगवडे, पुणदी, वासुंबे या गावांत करेक्ट कार्यक्रम झाल्याची उघड चर्चा आहे. गावात बहुमत असूनही झालेला पराभव उमेदवारांच्या आणि गावकऱ्यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे या पराभवाचे पडसाद जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकीत उमटणार आहेत.
ग्रामपंचायतीची पुनरावृत्ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत झाली, तर त्याचा फटका भाजप आणि राष्ट्रवादीला, पर्यायाने आमदार, खासदारांना बसणार आहे. त्यामुळे गावपातळीवरील गटबाजी मोडीत काढण्याचे आव्हान दोन्ही पक्षांच्या नेत्यांना पेलावे लागणार आहे.
इच्छुकांना धास्ती करेक्ट कार्यक्रमाची
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी भाजप आणि राष्ट्रवादीतून अनेकजण इच्छुक आहेत. मात्र, ग्रामपंचायतीच्या निकालाचा अनुभव पाहता या इच्छुकांनी करेक्ट कार्यक्रमाची धास्ती घेतली आहे. गावात बहुमत असले तरी निवडून येईनच, याचा भरवसा राहिला नसल्यामुळे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.