मिरजेत भाजप-राष्टवादीत हाणामारी, दगडफेक : ६७ जणांविरुध्द गुन्हा, कुरणे-हारगे गट आमनेसामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 09:48 PM2018-09-13T21:48:04+5:302018-09-13T21:52:35+5:30
मिरज : येथील बुधवार पेठेतील गणेश मिरवणुकीत फटाके फोडून नाचल्याच्या व वाहन पुढे नेण्याच्या कारणावरून भाजपचे माजी नगरसेवक महादेव कुरणे व राष्टवादीच्या नगरसेविका संगीता हारगे यांच्या गटात गुरुवारी तुफान मारामारी झाली. चाकूहल्ला व दगडफेकीमुळे काही काळ तणाव निर्माण झाला. मारामारीत दोन्ही गटाचे आठजण जखमी झाले असून पोलिसांनी संगीता हारगे, अभिजित हारगे, महादेव कुरणे यांच्यासह दोन्ही गटाच्या ६७ जणांवर दंगल व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
बुधवार पेठेत भाजपचे कुरणे व राष्टवादीचे हारगे यांच्यात राजकीय वैमनस्य आहे. महापालिका निवडणुकीत महादेव कुरणे यांच्या पत्नी जयश्री आणि संगीता हारगे यांच्यात लढत होऊन हारगे विजयी झाल्या होत्या. त्यादरम्यान हारगे गटातील अनिल हारगे व अन्य काही कार्यकर्ते कुरणे गटात सहभागी झाल्याने, या दोन गटात कुरबुरी सुरू आहेत. गुरुवारी दुपारी अनिल हारगे, अभिजित कुरणे, सतीश हारगे यांच्यासह कुरणे समर्थकांनी घरगुती गणेशमूर्तीची ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून मिरवणूक काढली होती.
मिरवणूक बसवेश्वर चौकात आल्यानंतर तेथे हारगे गटाचे समर्थक टेम्पोत गणेशमूर्ती घेऊन थांबले होते. यावेळी कुरणे गटाचा ट्रॅक्टर रोखून फटाके वाजवत नाचल्याच्या कारणावरून हारगे समर्थकांनी कुरणे समर्थकांवर काठ्यांनी व चाकूने हल्ला चढविला. यावेळी दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली. हारगे समर्थकांनी अभिजित कुरणे यांच्या घरावर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. मारामारीत कुरणे गटाचे अमित कुरणे, पिंटू कुरणे, रविशंकर नकाते, सारिका हारगे, अनिता हारगे, तर हारगे गटाचे अभिजित हारगे, बाबूराव हारगे, उमेश मिरजे, अक्षय फुटाणे, योगेश तहसीलदार जखमी झाले.
याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक अनिकेत भारती, निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्यासह पोलीस पथकाने बुधवार पेठेत जाऊन जमावाला पिटाळून लावले. मारामारीच्या घटनेमुळे दोन गटात तणाव निर्माण झाला होता. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. मारामारीप्रकरणी तक्रार देण्यासाठी आलेल्या दोन्ही गटातील महिला परस्परांच्या अंगावर धावून गेल्याने पोलीस ठाण्यात गोंधळ निर्माण झाला होता.
पोलिसांनी दोन्ही गटाच्या ६७ जणांविरूध्द दंगल व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून दहाजणांना ताब्यात घेतले आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी शहर पोलीस ठाण्यास भेट देऊन, अशांतता निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.
हारगे गटाच्या यांच्यावर गुन्हा दाखल...
कुरणे गटाच्या सारिका हारगे यांनी नगरसेविका संगीता हारगे, अभिजित हारगे, मिलिंद हारगे, राधिका हारगे, पप्पू मंगावते, अण्णासाहेब हारगे, वैभव मंगावते, महेश नेर्लेकर, रोहित नेर्लेकर, अक्षय हारगे, अजित हारगे, उमेश मिरजे, बाबू हारगे, सुनील मंगावते, शहनवाज पटवेगार, यासिन मुल्ला, मनोज हारगे, मोरेश्वर हारगे, अक्षय फुटाणे, सुनील फुटाणे, नीलेश मंगावते, सुधाकर कोरे, महादेव मंगावते, शुभम शिवपुजे, संतोष मंगावते, महेश बसरगे, सुभव्वा मिरजे, मंजू हारगे, शोभा हारगे, सुनीता हारगे, अस्मिता हारगे, शेवंता नेर्लेकर, बाबा नेर्लेकर, मीनाक्षी नेर्लेकर, प्रभावती मंगावते, अनिता पाटील, जयश्री नेर्लेकर व रूपाली हारगे यांनी गणेशमूर्तीचे वाहन अडवून दगडफेक व काठीने मारहाण केल्याची फिर्याद दिली आहे.
कुरणे गटाच्या यांच्यावर गुन्हा दाखल...
याप्रकरणी हारगे गटाच्या राधिका मिलिंद हारगे यांनी, अभिजित कुरणे, महादेव कुरणे, मांतेश कुरणे, शिवम ढंग, रितेश बसरगे, राकेश बसरगे, अभिजित कोरे, अनिल हारगे, शुभम हारगे, रवी हारगे, ओंकार हारगे, तुषार नकाते, आप्पाजी कोरे, स्रेहल कुरणे, सुमित कुरणे, सुरेखा कुरणे, महादेव मल्लाप्पा कुरणे, शंकर कुरणे, रावसाहेब कुरणे, मिलिंद जिरगे, विशाल कागवाडे, अमित कोरे, सुनीता कुरणे, संजीवनी कुरणे, आशा नकाते, प्रमोद हारगे, चिदानंद हारगे, रावसाहेब हारगे, प्रवीण गोरे यांनी मारहाण केल्याची तक्रार दिली आहे.
मिरजेतील बुधवार पेठेत गुरुवारी भाजप व राष्टवादी समर्थकांत मारामारी व दगडफेकीमुळे तणाव निर्माण झाला होता. पोलीस पथकाने जमावाला पिटाळून लावले.
मिरजेतील बुधवार पेठेत गुरुवारी भाजप व राष्टवादी समर्थकांत मारामारी झाली.
अभिजित कुरणे यांच्या घरावर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या.