तासगावमध्ये भाजप-राष्ट्रवादी अलर्ट

By admin | Published: November 15, 2015 10:57 PM2015-11-15T22:57:29+5:302015-11-15T23:50:58+5:30

आजपासून सरपंच निवडी : नेत्यांच्या बैठका; पदांची आॅफर--ग्रामपंचायत निवडणूक

BJP-Nationalist Alert in Tasgaon | तासगावमध्ये भाजप-राष्ट्रवादी अलर्ट

तासगावमध्ये भाजप-राष्ट्रवादी अलर्ट

Next

दत्ता पाटील - तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंच निवडी आजपासून (ता. १६) तीन दिवसांच्या टप्प्यात होणार आहेत. आपल्याच गटातील सरपंच व्हावा, यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून यंत्रणा राबवली जात आहे. काटावरचे बहुमत असणाऱ्या गावांत विरोधी गटातील सदस्याला फोडण्यासाठी सरपंचपदापासून ते अगदी पॅकेजपर्यंतची आॅफर दिल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर ३९ गावांतील राजकीय वर्तुळ अलर्ट झाले आहे.
तासगाव तालुक्यातील ३९ गावांतील ग्रामपंचायतींच्या निवडणुका अटीतटीच्या झाल्या. प्रामुख्याने भाजप आणि राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांच्या पारंपरिक गटातच निवडणुकीचा आखाडा रंगला. अनेक गावांत प्रस्थापितांना धक्के बसले. निकालानंतर भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांत वर्चस्वाची लढाईही सुरू झाली. खा. संजयकाका पाटील आणि आमदार सुमनताई पाटील या दोन्ही नेत्यांनी तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर आपल्याच गटाचे वर्चस्व असल्याचा दावा केला. तालुक्यासह जिल्ह्यातील जनतेत मात्र नेमके वर्चस्व कोणाचे? याबाबतचा संभ्रम कायम राहिला. ३९ गावांतील सरपंच निवडीनंतर मात्र हा संभ्रम दूर होणार असून, तालुक्यावर कोणाचे वर्चस्व राहणार, याचा फैसला होणार आहे. त्यामुळे सरपंच निवडीचा कार्यक्रमही नेत्यांकडून प्रतिष्ठेचा केला आहे. यापार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांनी बैठका घेत सरपंच निवडीसाठी दक्षता बाळगली आहे.
काटावर व संमिश्र सत्ता असणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी विरोधी गटातील काही सदस्यांना गळ टाकण्याचे प्रकार सुरू आहेत. काही सदस्यांना थेट सरपंच, उपसरपंचपदाची आॅफरही देण्यात आल्याची चर्चा आहे; तर काही ठिकाणी लाखांच्या घरात पॅकेज दिल्याची चर्चा आहे.

सरंपच निवड तारखा
१६ नोव्हेंबर आळते, बोरगाव, ढवळी, हातनोली, जुळेवाडी, कवठेएकंद, धामणी, निंंबळक, राजापूर, शिरगाव (वि.), तुरची, विसापूर, येळावी, १७ नोव्हेंबर धोंडेवाडी, धुळगाव, डोर्ली, गोटेवाडी, हातनूर, कौलगे, लोढे, मांजर्डे, मोराळे, नागाव (क.), नरसेवाडी, पाडळी, विजयनगर. १८ नोंव्हेंबर दहीवडी, डोंगरसोनी, गौरगाव, गव्हाण, जरंडी, लोकरेवाडी, पेड, सावळज, सिध्देवाडी, वज्रचौंडे, वडगाव, वाघापूर, यमगरवाडी.


सरपंचपदाचा तिढा सुटेना
काही गावांत सत्ताधारी कारभाऱ्यांना सत्तेतून पायउतार करण्यासाठी सर्वपक्षीय, अनेक गटातटांची मोट बांधण्यात आली होती. अनेक ठिकाणी असे प्रयोग यशस्वी झाले. मात्र सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदा सरपंच कोणत्या गटाचा? यावरून अनेक गावांत तिढा निर्माण झाला आहे. काही गावांत सरपंचपदाचा चेंडू नेत्यांच्या कोर्टात गेला आहे; तर काही ठिकाणी खलबते सुरू आहेत.

Web Title: BJP-Nationalist Alert in Tasgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.