महापुरावरून भाजप-राष्टवादी, काँग्रेसमध्ये जुंपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 06:57 PM2020-06-18T18:57:32+5:302020-06-18T19:00:40+5:30
महापुराच्या उपाययोजनांवरून सांगली जिल्ह्यातील काँग्रेस व भाजपमध्ये जुंपली आहे. भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी आपत्तीपूर्व उपाययोजना केल्या नसल्याची टीका करीत पालकमंत्री जयंत पाटील यांना जबाबदार धरले आहे, तर दुसरीकडे युवक काँग्रेस व युवक राष्ट्रवादीच्यावतीने पडळकर यांच्यावर टीका करण्यात आली.
सांगली : महापुराच्या उपाययोजनांवरून सांगली जिल्ह्यातील काँग्रेस व भाजपमध्ये जुंपली आहे. भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी आपत्तीपूर्व उपाययोजना केल्या नसल्याची टीका करीत पालकमंत्री जयंत पाटील यांना जबाबदार धरले आहे, तर दुसरीकडे युवक काँग्रेस व युवक राष्ट्रवादीच्यावतीने पडळकर यांच्यावर टीका करण्यात आली.
आ. पडळकर यांनी मंगळवारी पालकमंत्री जयंत पाटील यांच्यावर आपत्तीपूर्व नियोजनावरून टीका केली होती. पडळकर म्हणाले होते की, मागील महापुराचा अंदाज घेऊन यावेळी उपाययोजना करणे गरजेचे होते. जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांमध्ये अद्याप बोटी दिलेल्या नाहीत.
भविष्यात महापुराच्या माध्यमातून एखादी दुर्घटना घडली, तर पालकमंत्री जयंत पाटील व शासन त्यास जबाबदार राहील. खासदार संजयकाका पाटील यांनीही, स्थानिक नेत्यांना महत्त्वाच्या बैठकांना डावलले जात असल्याची खंत व्यक्त केली होती.
सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना बेदखल करण्याबाबतचा हा मुद्दा भाजपचे सरचिटणीस मकरंद देशपांडे यांनीही उपस्थित केला होता. भाजप नेत्यांनी एकीकडे जयंत पाटील यांच्यावर टीका सुरू केली असताना, युवक राष्ट्रवादी व काँग्रेसच्यावतीने पडळकरांवर हल्लाबोल केला आहे.
युवक काँग्रेसचे महापालिका क्षेत्राचे अध्यक्ष अजित दुधाळ यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अद्याप पूर आला नसताना आपत्तीचे, दुर्घटनांचे संभाव्य चित्र निर्माण करून पडळकर पालकमंत्री व शासनास जबाबदार ठरविण्याची तयारी करीत आहेत. त्यांची टीका ही द्वेषातून व स्वार्थापोटीची आहे.
मागील महापुरावेळी राज्यात भाजप सत्तेवर होते. त्यावेळी जिल्ह्यात दुर्घटना घडली. आपत्ती काळातील नियोजन फसले होते. त्यामुळे त्याची जबाबदारी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सोपवायची का? मागील महापुरातील नियोजनाबद्दल त्यांनी आत्मपरीक्षण करावे आणि त्यानंतर आपत्तीपूर्व नियोजनावर बोलावे, असे आवाहन त्यांनी केले.
युवक राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार म्हणाले की, मागील महापुराच्या काळात भाजपने काय नियोजन केले? भाजपचे नेते तेव्हा कुठे होते, ते स्वत: कोठे होते हे स्पष्ट करावे. महापुरात जनता तळमळत असतानाही भाजपच्या तत्कालीन मंत्र्यांनी बघ्याची भूमिका घेतली. विरोधात असतानाही काँग्रेस, राष्ट्रवादीच्या लोकांनी कर्तव्यभावनेने पूरग्रस्तांना मदत केली.