अपात्रतेच्या तक्रारीसाठी भाजप पदाधिकारी पुण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:25 AM2021-03-19T04:25:23+5:302021-03-19T04:25:23+5:30
सांगली : महापौर, उपमहापौर निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या सहा नगरसेवकांच्या अपात्रतेबाबत तक्रार करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी गुरुवारी पुण्यात दाखल झाले. ...
सांगली : महापौर, उपमहापौर निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या सहा नगरसेवकांच्या अपात्रतेबाबत तक्रार करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी गुरुवारी पुण्यात दाखल झाले. कागदपत्रांच्या फायलिंगला विलंब झाल्यामुळे अपात्रतेचा प्रस्ताव शुक्रवारी १९ मार्च रोजी सादर होणार आहे.
सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या फेब्रुवारीत पार पडलेल्या
महापौर, उपमहापौर निवडीवेळी सत्ताधारी भाजपमधून सात नगरसेवक फुटले. त्यातील पाचजणांनी काँग्रेस व राष्ट्रवादीला मतदान केले, तर दोघेजण गैरहजर राहिले. त्यात भाजपचे महेंद्र सावंत, स्नेहल सावंत, अपर्णा कदम, नसीमा नाईक यांनी उघडपणे मतदान केले होते, तर भाजपला पाठिंबा दिलेले अपक्ष नगरसेवक विजय घाडगे यांनीही आघाडीला मदत केली. माजी उपमहापौर आनंदा देवमाने व शिवाजी दुर्वे अनुपस्थित राहिले. त्यामुळे बहुमत असतानाही भाजपचा पराभव झाला.
यापैकी घाडगे वगळता सहा नगरसेवकांवर अपात्रतेच्या कारवाईसाठी भाजपकडून जोरदार हालचाली सुरू आहेत.
शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर व सभागृह नेते विनायक सिंहासने यांनी उच्च न्यायालयातील वकिलांशी चर्चा करून या सहाजणांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजाविली होती. तिला नगरसेवकांनी उत्तरही दिले आहे, पण हा खुलासा भाजपने फेटाळून लावत आता विभागीय आयुक्तांकडे अपात्रतेचा प्रस्ताव दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. ऑनलाईन मतदान प्रक्रियेची सीडी पुराव्यांदाखल मिळविली आहे.
गुरुवारी भाजपचे पदाधिकारी पुण्यात दाखल झाले. वकिलांच्या सूचनेनुसार योग्य फाईल तयार करण्यास विलंब झाल्याने आता ही तक्रार शुक्रवारी दाखल होणार आहे, अशी माहिती गटनेते विनायक सिंहासने यांनी दिली.