भाजपकडून केवळ देशहिताचा विचार, कार्यकर्त्यांनी पक्ष बांधणीला प्राधान्य द्यावे - केंद्रीय राज्यमंत्री बघेल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 01:03 PM2022-08-24T13:03:12+5:302022-08-24T13:03:44+5:30
देश भ्रष्टाचारमुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. सामान्य घटक विकासाच्या प्रवाहात येऊन ते आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावेत, अशा योजना मोदी सरकारने वाडी-वस्तीपर्यंत पोहोचविल्या.
इस्लामपूर : भाजप हा सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. देशहिताचा विचार आणि संघटनात्मक कामाला प्राधान्य देणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा पक्षात सन्मान केला जातो. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पूर्ण बहुमतासह सत्तेवर येण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने पक्ष बांधणीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केंद्रीय कायदा व न्याय राज्यमंत्री सत्यपालसिंह बघेल यांनी केले.
येथील प्रकाश शिक्षण संकुलाच्या सभागृहात बघेल यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रांतील पक्षाच्या कोअर कमिटीतील पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला. मतदारसंघाचे प्रभारी आ. गोपीचंद पडळकर अध्यक्षस्थानी होते.
बघेल म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे सर्व कार्यकर्ते देश सेवकाच्या भूमिकेतून काम करत आहेत. शहरासह ग्रामीण विभागाच्या विकासावर भर दिला आहे. देश भ्रष्टाचारमुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. सामान्य घटक विकासाच्या प्रवाहात येऊन ते आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावेत, अशा योजना मोदी सरकारने वाडी-वस्तीपर्यंत पोहोचविल्या आहेत.
यावेळी आ. पडळकर, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी स्वागत केले. यावेळी खा. संजय पाटील, भगवानराव साळुंखे, हिंदूराव शेळके, विठ्ठल पाटील, मिलिंद कोरे, सुरेंद्र चौगुले, अशोकराव माने, तालुकाध्यक्ष धैर्यशील मोरे, माजी अध्यक्ष प्रसाद पाटील, अजित पाटील, अक्षय पाटील, अशोकराव खोत, सतेज पाटील, संजय हवलदार, एल. एन. शहा, प्रवीण परीट, चंद्रकांत पाटील, मधुकर हुबाले, संदीप सावंत, अक्षय कोळेकर, निवास पाटील, दादासाहेब रसाळ, यदूराज थोरात, रामभाऊ शेवाळे उपस्थित होते.