मतदान यंत्र घोटाळ्यामुळे भाजपची सत्ता

By admin | Published: April 16, 2017 10:52 PM2017-04-16T22:52:15+5:302017-04-16T22:52:15+5:30

वामन मेश्राम : भारत मुक्ती मोर्चातर्फे मिरजेत व्याख्यान

BJP power due to the polling scam | मतदान यंत्र घोटाळ्यामुळे भाजपची सत्ता

मतदान यंत्र घोटाळ्यामुळे भाजपची सत्ता

Next



मिरज : मतदान यंत्रे विश्वसनीय व पारदर्शक नाहीत. मतदान यंत्रातील घोटाळ्यामुळेच देशात भाजपची सत्ता आली आहे. काँग्रेसनेही यापूर्वी हीच पध्दत वापरली होती. हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाद्वारे राजकीय फायद्यासाठी तीन तलाक व समान नागरी कायद्याची चर्चा भाजपकडून सुरू असल्याचे भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी सांगितले.
भारत मुक्ती मोर्चातर्फे भीमा कोरेगाव मुक्ती संग्राम द्विशताब्दी व छत्रपती शिवाजी, महात्मा फुले, महात्मा बसवेश्वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त मिरजेत आयोजित कार्यक्रमात वामन मेश्राम यांनी, भावनिक मुद्द्यांवर ध्रुवीकरण करून बहुजन समाजाची दिशाभूल करण्याचे षड्यंत्र असल्याचा आरोप केला.
वामन मेश्राम म्हणाले, मतदान यंत्राविरोधात भाजपचे सुब्रम्हण्यम स्वामी यापूर्वी न्यायालयात गेले होते. त्यावेळी न्यायालयाने मतदानाची नोंद होणारे व्हीव्हीपॅट यंत्र जोडण्याचे आदेश दिले होते. मात्र काँग्रेसने न्यायालयाचा आदेश जुमानला नाही. मतदान यंत्राविरोधात बामसेफ सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर निवडणूक आयोगानेही पारदर्शक मतदान प्रक्रियेची जबाबदारी झटकली.
ते म्हणाले, कोणतीही मुस्लिम महिला न्यायालयात गेली नसताना, सर्वोच्च न्यायालयात तीन तलाक प्रथेबाबत सुनावणी सुरू आहे. देशातील पाच कोटी मुस्लिम महिलांनी शरीयत कायदा मान्य असल्याचे सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींना दिले आहे. तीन तलाक रद्द केल्यानंतर नवीन कायद्यामुळे मुस्लिम महिला हिंसाचाराला बळी पडण्याची भीती आहे. तीन तलाक व समान नागरी कायद्याची चर्चा राजकीय फायद्यासाठी सुरू आहे. राज्यघटनेने अल्पसंख्याक, आदिवासी, भटके विमुक्तांना त्यांच्या धार्मिक पध्दतीने आचरणाचे स्वतंत्र दिले असताना, त्यावर अतिक्रमण करता येणार नाही. देशात ५२ टक्के ओबीसींची संख्या आहे. त्यांनाही एससी, एसटीप्रमाणे सामाजिक, शैक्षणिक हक्क मिळाले पाहिजेत. यासाठी ओबीसींची जनगणना आवश्यक आहे. मात्र जनगणना केल्यास ओबीसींची सत्ता येईल, या भीतीने ओबीसींची जनगणना करण्यात येत नसल्याचे मेश्राम यांनी सांगितले.
उद्योजक राजेंद्र खाडे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. उत्पादन शुल्क सहआयुक्त अश्विनकुमार उके, मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती जुबेर साहब, फादर पास्टर जोएल पळसकर, लिंगायत सभेचे नामदेव कोरे यांचीही भाषणे झाली. मनोज लोकरे यांनी प्रास्ताविक केले. चंद्रकांत नागवंशी यांनी सूत्रसंचालन केले. अरूण खरमाटे, प्रभाकर सनमडीकर, दत्ताजीराव नलवडे, उपमहापौर विजय घाडगे, नगरसेवक शेखर माने, नामदेव करगणे, पृथ्वीराज पवार उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: BJP power due to the polling scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.