सांगलीत भाजपतर्फे गृहमंत्र्यांविरोधात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:23 AM2021-03-22T04:23:56+5:302021-03-22T04:23:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी करीत भाजपच्या वतीने सांगलीत निदर्शने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी करीत भाजपच्या वतीने सांगलीत निदर्शने करण्यात आली. यावेळी गृहमंत्री व सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
विश्रामबाग येथील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे म्हणाले की, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना बोलावून महिन्याला शंभर कोटी रुपये वसूल झाले पाहिजेत, असे आदेश दिल्याची बाब माजी पोलीस आयुक्तांनी करणे धक्कादायक आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने ही अत्यंत लाजिरवाणी घटना आहे. इतक्या वर्षात अशा प्रकारचा आरोप कोणत्याही गृहमंत्र्यांवर कधीच झाला नव्हता. आरोप होऊनही गृहमंत्री राजीनामा देत
नाहीत. त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे, वसुलीच्या आरोपाची तातडीने सखोल चौकशी करून गृहमंत्र्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी आमची मागणी आहे.
भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्वाती शिंदे म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या लौकिकाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. हे महाविकास आघाडी सरकार नसून महावसुली आघाडी सरकार आहे. पोलीस खात्याचा वापर खंडणी वसुलीसाठी करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलिसांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न झाला आहे. एखादा पोलीस आयुक्त असे आरोप करतो म्हणजे ती निश्चितच
गंभीर घटना आहे. त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करावा.
आंदोलनात महापालिकेचे गटनेते विनायक सिंहासने, माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, नगरसेवक युवराज बावडेकर, संदीप आवटी, संजय कुलकर्णी, सुबराव मद्रासी, नगरसेविका गीतांजली ढोपे पाटील, सोनाली सगरे, अप्सरा वायदंडे, कल्पना कोळेकर, ऊर्मिला बेलवलकर, दरिबा
बंडगर, अमर पडळकर, धनेश कातगडे, अतुल माने, दीपक माने आदी उपस्थित होते.