तृणमूल काँग्रेसचा भाजपकडून निषेध, सांगलीत निदर्शने : कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 02:53 PM2021-05-05T14:53:56+5:302021-05-05T14:55:50+5:30
Bjp Sangli : पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या व त्यांच्यावरील हल्ल्यांचा निषेध करीत भाजपच्यावतीने बुधवारी सांगलीत निदर्शने करण्यात आली. हल्लेखोर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली.
सांगली : पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या व त्यांच्यावरील हल्ल्यांचा निषेध करीत भाजपच्यावतीने बुधवारी सांगलीत निदर्शने करण्यात आली. हल्लेखोर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली.
सांगलीत आ. सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली विश्रामबाग येथील त्यांच्या संपर्क कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. ह्यटीएमसी सरकार का काम क्रुरता है, पश्चिम बंगाल में भाजप कार्यकर्ता मरता हैह्ण असे फलक हाती घेऊन आंदोलक सहभागी झाले होते.
यावेळी आ. गाडगीळ म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्या राज्यात सुडाचे राजकारण चालू झाले आहे. ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसचे गुंड हल्ले करत आहेत. भाजपा कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावणे असे प्रकार घडत आहेत. जवळपास ८ ते १० भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत. ही लोकशाहीची हत्या आहे.
केंद्र शासनाने याठिकाणचे हे हत्याकांड थांबविताना संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी केली. आंदोलनात युवामोर्चाचे अध्यक्ष धीरज सूर्यवंशी, नगरसेवक संजय कुलकर्णी, विश्वजित पाटील, गणपती साळुंखे, मकरंद म्हामुलकर, शरद नलावडे, अतुल माने, श्रीकांत वाघमोडे, सतीश खंडागळे सहभागी झाले होते.