Sangli: मिरजेत पालकमंत्री सुरेश खाडे यांची बंडखोरांशी लढत, आघाडीत बंडखोरीची चिन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 05:55 PM2024-10-15T17:55:41+5:302024-10-15T17:56:56+5:30
जयंत पाटील यांच्या गटाची भूमिका काय ?
सदानंद औंधे
मिरज : पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या विरोधात भाजप बंडखोर मोहन वनखंडे यांनी बंडखोरी करीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. वनखंडे यांना काँग्रेसच्या उमेदवारीच्या भीतीने महाविकास आघाडीत बंडखोरी होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पालकमंत्री खाडे यांची लढत भाजप व महाविकास आघाडीच्या बंडखोरांशी होऊ शकते.
लोकसभा निवडणुकीत भाजप मिरजेत २५ हजाराने पिछाडीवर आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये बंडखोरी झाल्याने खाडे यांच्यापुढे विरोधकांचे आव्हान आहे. निवडणुकीच्या तोंडावर पालकमंत्र्यांच्या विरोधात आघाडी उघडणारे भाजपचे वनखंडे यांना मिरजेत महाविकास आघाडीची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. मिरजेत चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या सुरेश खाडे यांना आव्हान देणाऱ्या वनखंडे यांच्यामुळे मिरजेत भाजपमध्ये दुफळी निर्माण झाली आहे.
जयंत पाटील यांच्या गटाची भूमिका काय ?
लोकसभा निवडणुकीतील पिछाडी भरून काढण्यासाठी पालकमंत्री खाडे मतदारसंघात ठाण मांडून आहेत. तर शहरात निधीसाठी पालकमंत्र्यांना पाठिंबा देणाऱ्या काँग्रेस नगरसेवकांनी घूमजाव केल्याने नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. सांगलीचे खासदार विशाल पाटील व माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या पुढाकाराने भाजप बंडखोराचा काँग्रेस प्रवेश झाला. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मिरजेतील गट नाराज झाला. हा गट कोणती भूमिका घेणार यावरही निवडणुकीची समीकरणे अवलंबून आहेत.
तिरंगी लढतीची शक्यता
मोहन वनखंडे यांच्या महाविकास आघाडीत प्रवेशामुळे उमेदवारी भाजप बंडखोरास मिळाल्यास सामूहिक राजीनामे व बंडखोरीचा इशारा उद्धवसेनेने दिला आहे. तसेच काँग्रेसचे सी. आर. सांगलीकर यांनीही बंडखोरी करून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. जयंत पाटील यांच्या समर्थक गटाचीही नाराजी कायम आहे. त्यामुळे भाजपप्रमाणे महाविकास आघाडीतही बंडखोरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिरजेत तिरंगी लढतीची चर्चा आहे.
२०१९ निवडणूक
- सुरेश खाडे (भाजपा) ९६,३६९,
- बाळासाहेब होनमोरे (आघाडी) ६५,९७१,
- विजयी मताधिक्य ३०,३९८