मिरजेत सुरेश खाडे यांची भाजप बंडखोराशी लढत?, मोहन वनखंडे यांना महाविकास आघाडीची उमेदवारी निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 07:02 PM2024-10-03T19:02:15+5:302024-10-03T19:02:57+5:30
आठवड्याभरात काँग्रेस प्रवेश
सदानंद औंधे
मिरज : मिरजेत पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या विरोधात भाजपचे बंडखोर मोहन वनखंडे यांना महाविकास आघाडीची उमेदवारी निश्चित झाल्याची सुत्राची माहिती आहे. येत्या आठवड्यात वनखंडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे इच्छुक अस्वस्थ झाले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांच्या विरोधात भाजप अनुसूचित जाती-जमाती आघाडीचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे यांनी आघाडी उभारली आहे. खाडे यांच्या प्रत्येक निवडणुकीचे नियोजन करणारे वनखंडे यांनी त्यांना थेट आव्हान दिले आहे. वनखंडे यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केल्याने मिरज भाजपमध्ये दुफळी झाली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप मिरजेत २५ हजाराने पिछाडीवर आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीपूर्वी मिरजेत बंडखोर गटाने विरोधकांशी संधान साधल्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक भाजपसाठी आव्हानात्मक आहे.
पालकमंत्र्यांचे विरोधक व जनसुराज्य शक्तीचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्यासोबत वनखंडे यांची जवळीक आहे. जनसुराज्य शक्तीकडून वनखंडे यांच्यासाठी मिरज मतदारसंघाची मागणी केली आहे. शिवाय वनखंडे हे महाविकास आघाडीचे नेते खासदार विशाल पाटील व माजी मंत्री जयंत पाटील यांच्या संपर्कात आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही पालकमंत्र्यांशी लढत देण्यासाठी वनखंडे यांना उमेदवारी देण्याची मागणी आहे. त्यामुळे आठवड्याभरात मोहन वनखंडे काॅंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे.
चार दिवसांपूर्वी काॅंग्रेसतर्फे विशाल पाटील समर्थकांनी पत्रकार परिषदेत भाजप बंडखोर आयात उमेदवार आम्हाला चालेल, असे जाहीर केले आहे. यामुळे महाविकास आघाडीकडून पक्षातील नव्हे, तर आयात उमेदवार निवडणूक लढविणार चर्चा आहे.
मिरजेबाबत व्हिजन स्पष्ट करा
भाजप व काॅंग्रेसचे संभाव्य उमेदवार असलेल्या पालकमंत्री सुरेश खाडे व मोहन वनखंडे या दोघांनी पुढील पाच वर्षांत मिरजेसाठी काय ’व्हिजन’ असणार आहे. हे किसान चौकात मिरज सुधार समितीच्या व्यासपीठावर येऊन स्पष्ट करावे, असे आवाहन मिरज सुधार समितीने केले आहे.