चंद्रकांत पाटील यांच्या भरवशावर भाजपची वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:30 AM2021-08-21T04:30:11+5:302021-08-21T04:30:11+5:30
अशोक पाटील लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : विधानसभा निवडणुकीत इस्लामपूर मतदारसंघात निशिकांत पाटील यांनी, तर शिराळा मतदारसंघात सम्राट महाडिक ...
अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : विधानसभा निवडणुकीत इस्लामपूर मतदारसंघात निशिकांत पाटील यांनी, तर शिराळा मतदारसंघात सम्राट महाडिक यांनी बंडखोरी केली. ती राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडली. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीविरोधात भाजपमधील नेते एकत्र आणण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आश्वासनांची खैरात सुरू केली आहे. त्यासाठी बैठका सुरू केल्या आहेत. त्यांच्या भरवशावरच भाजपची वाटचाल सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना युती होती. इस्लामपूर मतदारसंघ शिवसेनेला गेल्याने भाजपचे उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांना दिलेले उमेदवारीचे आश्वासन पक्षाला पाळता आले नाही. त्यामुळे पाटील यांनी बंडखोरी केली. शिराळा मतदारसंघातही तसेच झाले. सम्राट महाडिक यांनाही दिलेला शब्द भाजपने पाळला नाही. परिणामी त्यांची बंडखोरी भाजपला महागात पडली. महाडिक यांची मते पाहून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाडिक बंधूंना भाजपमध्ये घेऊन राज्य पातळीवरील पदे दिली. शिवाय भविष्यात शिराळ्यातून उमेदवारीचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता दोघेही बंधू पक्ष मजबुतीसाठी प्रयत्नशील आहेत.
राज्यात महाआघाडी सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित आहेत. इस्लामपूर मतदारसंघातील उमेदवारीचा मार्ग आता भाजपला मोकळा झाला आहे. पालिकेतील पक्षप्रतोद विक्रम पाटील भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते मानले जातात. निशिकांत पाटील, राहुल महाडिक यांचा भाजप प्रवेश आजही निष्ठावान कार्यकर्त्यांना रुचलेला नाही. परंतु आगामी विधानसभेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरोधात निशिकांत पाटील यांना भाजपमधून उमेदवारीचा शब्द मिळालेला आहे, तर शिराळ्यात सम्राट महाडिक यांनाही शब्द देण्यात आला आहे. त्यामुळे शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख यांच्या पदरात काय पडणार, हा प्रश्न उपस्थित होणार आहे. सध्यातरी चंद्रकांत पाटील यांच्या भरवशावरच भाजपची वाटचाल सुरू आहे.
चौकट
आश्वासने कोणाकोणालार?
कामेरी जिल्हा परिषद मतदारसंघात जिल्हा बॅँकेचे संचालक सी. बी. पाटील यांचा गट आहे. त्यांचे पुत्र जयराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या काही आश्वासनांवरच सी. बी. पाटील गट भाजपमध्ये वाटचाल करत आहे. अशीच अवस्था आष्ट्याचे वैभव शिंदे यांचीही आहे.