शेतकऱ्यांच्या परिस्थितीला भाजप जबाबदार
By Admin | Published: September 17, 2016 10:46 PM2016-09-17T22:46:22+5:302016-09-18T00:04:28+5:30
जयंत पाटील : बोरगावमध्ये विकास कामांचे उद्घाटन, शेतकऱ्यांच्या मालाला आधारभूत किंमत नाही
कवठेमहांकाळ : भाजपचे सरकार हे उद्योगपतींना धार्जिण असून, गोरगरीब, शेतकऱ्यांच्या विरोधातील आहे. सर्वसामान्य माणसांचा विकास हे या भाजपचे ध्येय नसून, केवळ सत्तेचा स्वत:साठी फायदा घेणे एवढेच त्यांना माहीत असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार माजी मंत्री जयंत पाटील यांनी केली. आज राज्यातील या परिस्थितीला पूर्णपणे भाजप सरकार जबाबदार आहे. या शासनाला सत्तेवर राहण्याचा अधिकार नसल्याचीही टीका यावेळी पाटील यांनी केली.
बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे जयंत पाटील यांच्याहस्ते २५ लाखाच्या विकास कामांचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. तसेच युवक राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष गणेश पाटील यांचाही सत्कार जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. आमदार सुमनताई पाटील अध्यक्षस्थानी होत्या.
पाटील म्हणाले, तालुक्यात युवक राष्ट्रवादीचे काम अध्यक्ष गणेश पाटील यांनी जोरात सुरु केले आहे. पक्ष बळकटीसाठी हे गरजेचे असून पाटील यांनी तालुक्यात युवकांची मोठी फळी निर्माण करावी व राष्ट्रवादी पक्ष तालुक्यात मजबूत करावा, त्यांना सर्व प्रकारची मदत करू, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहू, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
यावेळी आ. सुमनताई पाटील यांनी, भविष्यात मतदारसंघातील आबांची अपुरी कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करून, सर्वसामान्य जनतेला न्याय देणार असल्याचे सांगितले. तालुकाध्यक्ष गणेश पाटील यांनी, तालुक्यात युवक राष्ट्रवादीच्या माध्यमातून चांगले काम केले असून, त्यांना पूर्ण ताकद देण्याचे आश्वासन दिले. यावेळी गणेश पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना तालुकाध्यक्ष गणेश पाटील म्हणाले, भविष्यात आपण युवक राष्ट्रवादीच्या माध्यमातून आबांच्या विचाराने पक्षवाढीसाठी काम करू, तसेच आ. सुमनतार्इंना तालुक्यातून युवकांच्या माध्यमातून मोठी ताकद देऊ. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहल पाटील, विजयराव सगरे, नामदेवराव करगणे, भाऊसाहेब पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. बोरगाव येथील आबांच्या प्रयत्नातून मंजूर झालेली दोन सामाजिक सभागृहे, एक पिकअप् शेड यांचे उद्घाटन जयंत पाटील, आ. सुमनताई पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. तसेच युवक राष्ट्रवादीच्या शाखेचेही उद्घाटन करण्यात आले. महिला बचत गटातील महिलांना माऊली संस्थेमार्फत मोफत प्रवासी बॅगांचे वाटप करण्यात आले.
यावेळी ताजुद्दीन तांबोळी, जि. प. उपाध्यक्ष रणजित पाटील, सुरेश पाटील, गजानन कोठावळे, गणपती सगरे, सुरेखा कोळेकर, कुसूमताई मोठे, दत्ताजीराव पाटील, नारायण पवार, स्वाती लांडगे, शिवाजीराव पाटील, अविनाश पाटील, हणमंत देसाई, खंडू पवार उपस्थित होते. बाळासाहेब पाटील यांनी स्वागत केले, तर मोहन खोत यांनी आभार मानले.(वार्ताहर)
शेतकरी कर्जबाजारी : राज्य भांडवलदारांचे
राज्यात शेतकरी कर्जबाजारी आहे, कांद्याला, उसाला, शेतीमालाला योग्य तो भाव दिला जात नाही. साधी आधारभूत किंमतसुद्धा मिळत नाही. मग या शेतकऱ्यांनी जगायचे कसे? असा सवालही त्यांनी केला. या भाजप शासनाचे धोरण शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. त्यांना शेतकरी व शेती व्यवस्था मोडून भांडवलदारांचे राज्य प्रस्थापित करायचे असून, राष्ट्रवादी कदापी हे होऊ देणार नाही. भाजपचा हा डाव हाणून पाडणार असल्याचा इशारा जयंत पाटील यांनी दिला.