भाजप, शिंदे गटाचे सरकार इंग्रजांच्या विचाराचे, शरद कोळींचे जोरदार टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 04:03 PM2022-11-21T16:03:09+5:302022-11-21T16:04:04+5:30

इंग्रजांची राजवट जशी उलथवून टाकली तशी भाजपची इंग्रजांच्याच विचाराने चाललेली राजवट जनताच उलथवून टाकणार

BJP, Shinde group government strongly criticizes British thinking says Sharad Koli | भाजप, शिंदे गटाचे सरकार इंग्रजांच्या विचाराचे, शरद कोळींचे जोरदार टीकास्त्र

संग्रहित फोटो

Next

सांगली : तोडा, फोडा आणि झोडा ही नीती इंग्रजांनी अवलंबिली होती. त्याच पद्धतीने भाजप व शिंदे गटाचे सरकार विरोधकांवर दबाव आणत आहे. त्यामुळे हे इंग्रजांच्या विचाराने चालणारे सरकार आहे, हे सिद्ध झाले आहे, अशी टीका युवा सेनेचे प्रदेश विस्तारक शरद कोळी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.

ते म्हणाले की, इंग्रजांची राजवट जशी उलथवून टाकली तशी भाजपची इंग्रजांच्याच विचाराने चाललेली राजवट जनताच उलथवून टाकणार आहे. याची कल्पना आल्यानेच सत्तेतील लोक सैरभैर झाले आहेत. त्यामुळेच त्यांनी तोडा, फोडा, झाेडा ही नीती अवलंबिली आहे. शिवसेनेच्या आक्रमक नेत्यांवर खोटे आरोप करून खोट्या प्रकरणात गोवण्यासाठी यंत्रणा कामाला लावली आहे. आम्ही त्यांच्या या दबावतंत्राला भीक घालत नाही. भाजपने खुशाल आम्हाला जेलमध्ये टाकावे. महाराष्ट्राला लागलेली ही कीड बाजूला करेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही.

महाराष्ट्रात शिवसेनेतून जे आमदार गेले त्यांचा आम्ही आता विचारही करणार नाही; पण त्यांना ज्या शिवसैनिकांनी व जनतेने निवडून आणले ते आमच्यासोबत आहेत. त्यांना खोक्याने विकत घेता येणार नाही. या आमदारांना ईडीने भाजपमध्ये नेले आहे. त्यांचा हिशेब जनताच करेल.

...तर जीभ जागेवर राहणार नाही

छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराजांबाबत सतत राज्यपाल व भाजप नेते अपशब्द काढत आहेत. त्यांनी तोंड सांभाळून बोलावे, अन्यथा त्यांची जीभ जागेवर राहणार नाही, असा इशारा कोळी यांनी दिला. शिवरायांचा खोटा इतिहास सांगणाऱ्यांनी संभाजी महाराजांच्या बलिदानाचा इतिहास वाचावा म्हणजे त्यांना वीरता काय असते ते कळेल.

दंगल घडविण्याचे षडयंत्र

राज्यात सरकारविरोधी वातावरण तयार होत असल्याने दंगली घडविण्याचे कारस्थान रचले जात आहे. भाजप हा मनुवादी विचाराचा पक्ष आहे. त्यामुळे ते काहीही करू शकतात, अशी टीकाही कोळी यांनी केली.

Web Title: BJP, Shinde group government strongly criticizes British thinking says Sharad Koli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.