Lok Sabha Election 2019 भाजप-सेना युतीने महाराष्ट्र चुलीत घातला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 11:44 PM2019-04-21T23:44:49+5:302019-04-21T23:45:14+5:30
सांगली : ‘पटक देंगे, युती गेली चुलीत’, म्हणणारे आज गळ्यात गळे घालून फिरत आहेत. या भाजप-सेना युतीने महाराष्ट्र चुलीत ...
सांगली : ‘पटक देंगे, युती गेली चुलीत’, म्हणणारे आज गळ्यात गळे घालून फिरत आहेत. या भाजप-सेना युतीने महाराष्ट्र चुलीत घातला आहे. सबका विकास होण्याऐवजी केवळ मोदींचाच विकास झाला, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी रविवारी सांगलीत भाजप-शिवसेनेचा समाचार घेतला. वंचित बहुजन आघाडी ही भाजपची ‘बी टीम’ असून, त्यांच्यात साटेलोटे असल्याचा आरोपही त्यांनी केला.
काँग्रेस-राष्ट्रवादी, स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत चव्हाण बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री मधुकर चव्हाण, आ. विश्वजित कदम, आ. मोहनराव कदम, माजी आ. पी. एन. पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे संजय बजाज, माजी महापौर सुरेश पाटील, हारुण शिकलगार उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले की, नरेंद्र मोदींनी पाच वर्षांत देश लुटला आहे. त्यामुळेच ‘चौकीदार चोर है’असे लोक म्हणू लागले आहेत. महाराष्ट्रातील फडणवीस सरकारनेही जनतेची फसवणूक केली आहे. कर्जमाफीचे पैसे अजूनही शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ म्हणणाऱ्यांपासून मुलींना वाचविण्याची वेळ आली आहे. सतत अभ्यास करणारे फडणवीस परीक्षेत नापास झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत राज्यात अंडरकरंट आहे. जनता भाजपची सत्ता खाली खेचल्याशिवाय राहणार नाही.
विशाल पाटील माझी परवानगी घेऊनच स्वाभिमानीतर्फे निवडणूक लढवित आहेत. जिल्ह्यात वसंतदादांची पुण्याई अजूनही संपलेली नाही. ते या निवडणुकीत बॅटने षटकार लगावतील. मोदी, फडणवीस यांंना संसदेत मान हलविणारे खासदार हवे आहेत. काम करणारा का नको, असा सवालही चव्हाण यांनी केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रबळ लोकशाहीसाठी घटना लिहिली. त्यांच्याच नातवाने एमआयएम या जातीयवादी पक्षासोबत युती केली आहे. हे सारे पाहून बाबासाहेबही ढसाढसा रडत असतील. त्यांनी लोकशाहीचा खून केला, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता सुशीलकुमारशिंदे यांनी केली. विश्वजित कदम म्हणाले की, विधानपरिषदेच्या निवडणुकीवेळी विशाल पाटील यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे विश्वजित काय करणार, असे लोक विचारत होते. पण पलूस-कडेगावमधून विशालला मताधिक्य देणार आहोत. विशाल पुन्हा चुकला, तर अशोक चव्हाण यांनी त्याचा कान पिळावा.
विशाल पाटील म्हणाले की, वसंतदादांच्या सांगली जिल्ह्याचा नावलौकिक देशात व्हावा, यासाठी प्रयत्न करणार आहोत. पाणी, उद्योग, रोजगार हे प्रश्न घेऊन निवडणुकीत उतरलो आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे यांनी स्वागत केले. यावेळी आ. रामहरी रूपनवर, प्रकाश सातपुते, आनंदराव मोहिते, नितीन गोंधळे, कमलाकर पाटील, मंगेश चव्हाण, नगरसेवक अभिजित भोसले, वर्षा निंबाळकर, सुरेश शेंडगे, नामदेवराव मोहिते उपस्थित होते.
वसंतदादांचा पुतळा झाकला
स्टेशन चौकात भाजपच्या सभेवेळी वसंतदादा पाटील यांचा पुतळा झाकण्यात आला होता. त्यावर विशाल पाटील म्हणाले की, दादांचा पुतळा झाका, फोटो काढून टाका; पण त्यांचे विचार जनतेच्या मनात रूजले आहेत, ते कसे काढणार? हाच धागा पकडत अशोक चव्हाण म्हणाले की, वसंतदादांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची जन्मशताब्दी शासनाने साजरी करायला हवी होती. सांगलीत येऊन त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन आशीर्वाद घ्यायला हवा होता. पण त्यांचे पुतळे झाकण्याचे काम भाजपने केले. त्यांना लाज कशी वाटत नाही?
संसदेत दोनदाच तोंड उघडले
सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, सोलापुरात गेल्यावेळी भाजपचा खासदार निवडून आला. त्याने पाच वर्षात संसदेत दोनदाच तोंड उघडले. एकदा शपथ घेताना आणि दुसºयांदा जांभई देताना, असे म्हणताच सभेत हशा पिकला. त्यावर व्यासपीठावरील महेश खराडे यांनी, सांगलीच्या खासदाराने तर कधीच तोंड उघडले नसल्याचा टोला लगावला.
त्यांना जोड्याने मारले पाहिजे!
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंग हिने २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील शहीद हेमंत करकरेंचा अपमान केला. पण पंतप्रधान मोदी मात्र त्यांचे समर्थन करीत आहेत. त्यातून त्यांची मानसिकता दिसून येते. शहिदांचा अपमान करणाºयांना जोडे मारले पाहिजेत, अशा शब्दात अशोक चव्हाण यांनी संताप व्यक्त केला.