स्वाभिमानी शेतकरी संघटनेला भाजप, शिवसेनेकडून ऑफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 03:29 PM2019-11-01T15:29:22+5:302019-11-01T15:31:43+5:30
राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी भाजप, शिवसेनेचे अथक प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे अपक्ष आणि मित्र पक्षातील निवडून आलेल्या आमदारांचा भाव चांगलाच वधारला आहे. विदर्भातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार निवडून आले आहेत. त्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी भाजप आणि शिवसेनेने स्वाभिमानीचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी संपर्क केल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
अशोक पाटील
इस्लामपूर : राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी भाजप, शिवसेनेचे अथक प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे अपक्ष आणि मित्र पक्षातील निवडून आलेल्या आमदारांचा भाव चांगलाच वधारला आहे. विदर्भातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार निवडून आले आहेत. त्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी भाजप आणि शिवसेनेने स्वाभिमानीचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी संपर्क केल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात भाजप-शिवसेना बॅकफुटवर गेली आहे. लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांचा पराभव झाल्यानंतर दक्षिण महाराष्ट्रातील शेतकरी चळवळ मोडीत निघणार, असेच चित्र निर्माण झाले होते. परंतु विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार देवेंद्र भुयार यांनी अमरावती जिल्ह्यातील वरुडमोरशी मतदार संघातून विद्यमान मंत्री अनिल भांडे यांचा पराभव केला. त्यामुळे राज्यातील संघटनेला ऊर्जा मिळाली आहे.
दरम्यान, राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने युध्दपातळीवर प्रयत्न चालवले आहेत. परंतु त्याला शिवसेनेकडून प्रतिसाद मिळत नाही. मुख्यमंत्रिपदासह ५० टक्क्यावर शिवसेना ठाम असल्याने दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेसाठी वेगळ्या वाटा चोखाळण्यास सुरुवात केली आहे.
सत्ता स्पर्धेत अपक्ष व मित्र पक्षांच्या आमदारांचा भाव वधारला आहे. त्यातच शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी माजी खा. शेट्टी यांच्याशी संपर्क साधून शिवसेनेला पाठिंबा द्यावा, अशी विनंती केल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.