Sangli: इस्लामपूर मतदारसंघासाठी भाजप-शिवसेनेत रस्सीखेच, जयंत पाटील यांच्याविरोधात उमेदवार कोण ?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 06:29 PM2024-09-27T18:29:21+5:302024-09-27T18:29:53+5:30
आनंदराव पवार यांचा दावा कायम, निशिकांत पाटील यांचीही जोरदार तयारी
अशोक पाटील
इस्लामपूर : इस्लामपूर मतदारसंघासाठी भाजप-शिवसेनेमध्ये जाेरदार रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार मुंबईत तळ ठोकून आहेत. तर गौरव नायकवडी यांच्याही मुंबई वाऱ्या वाढल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत इस्लामपूर मतदारसंघ शिवसेनेसाठीच आहे. असा पवार यांचा दावा आहे. दुसरीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनीही उमेदवारीसाठी चौफेर फिल्डिंग लावली आहे. जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक यांनीही छुपी यंत्रणा राबविली आहे.
इस्लामपूर मतदारसंघात विकास कामांच्या उद्घाटनावरून आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि शिवसेनेचे गौरव नायकवडी आघाडी उघडली आहे. दोघांनीही महायुतीच्या उमेदवारीवर दावा केला आहे. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार यांनी मुंबईत तळ ठोकून आहेत. इस्लामपूर मतदारसंघात परत येताना आपण उमेदवारी घेऊनच येऊ, असा त्यांचा दावा आहे. दुसरीकडे गौरव नायकवडी यांनीही वाळवा येथील विकास कामांच्या उद्घाटनावरून जयंत पाटील यांना काळे झेंडे दाखवत विरोध केला आहे. आपणच मतदारसंघात शिवसेनेकडून दावेदार असल्याचा अप्रत्यक्षपणे नायकवडी यांनी दुजोरा दिला आहे.
एकंदरीत आगामी विधानसभेच्या रणांगणात आमदार जयंत पाटील यांनी आपली फौज इस्लामपूर मतदारसंघात उतरवली आहे. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून इस्लामपूर-आष्टा परिसरात मंजूर झालेल्या विकास कामांच्या उद्घाटनांचा श्रीगणेशा केला आहे. याउलट महायुतीकडून शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने, गौरव नायकवडी यांनीही विकास कामांची उद्घाटने करत आमदार जयंत पाटील यांना आव्हान दिले आहे. त्यातच आता भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी मतदारसंघात विकासाचे पर्व सुरू करून उद्घाटनांचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे सध्यातरी आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात महायुतीकडून उमेदवार कोण असणार? याबाबत अनिश्चितता आहे.
सध्या आपण मुंबई येथे तळ ठोकून आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इस्लामपूर दौऱ्यातच तयारीला लागा असा आदेश दिला आहे. त्यामुळे मतदारसंघ शिवसेनेकडेच राहणार आहे. शिवसेनेची उमेदवारी आपणासच मिळणार आहे. इस्लामपुरात परतताना उमेदवारी घेऊनच येऊ. - आनंदराव पवार, जिल्हाध्यक्ष, शिवसेना