सांगलीत भाजपने पाकिस्तानी मंत्र्याच्या प्रतिमेस मारले जोडे, पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेचा निषेध
By अविनाश कोळी | Published: December 17, 2022 02:34 PM2022-12-17T14:34:49+5:302022-12-17T14:35:29+5:30
सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याबद्दल पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल झरदारी भुट्टो यांच्या प्रतिमेस आज, शनिवारी भाजपच्यावतीने जोडे ...
सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याबद्दल पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल झरदारी भुट्टो यांच्या प्रतिमेस आज, शनिवारी भाजपच्यावतीने जोडे मारण्यात आले. सांगलीतील आमदार सुधीर गाडगीळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी भुट्टो यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
भुट्टो यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये पत्रकार परिषदेत मोदी यांच्यावर टीका केली होती. त्याचा निषेध भाजपच्यावतीने करण्यात आला. भाजपने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोदी यांनी देशात अत्यंत चांगले काम करून जगभरात देशाची चांगली प्रतिमा बनविली आहे. याचा राग आर्थिकदृष्ट्या खाईत गेलेल्या पाकिस्तानला येतो. द्वेषबुद्धीने ते वागतात. त्यामुळेच अमेरिकेत जाऊन त्यांनी हा द्वेष बाहेर काढला. बिनबुडाचे आरोप त्यांनी केले. त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करीत आहोत.
आंदोलनात भाजपच्या नेत्या नीता केळकर, माजी आमदार नितीन शिंदे, प्रदेश संघटक पृथ्वीराज पवार, शेखर इनामदार, दीपक शिंदे, श्रीकांत शिंदे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा ॲड. स्वाती शिंदे, महापालिकेच्या सभागृह नेत्या भारती दिगडे, संगीता खोत, अनारकली कुरणे, अविनाश मोहिते, सुब्राव मद्रासी आदी सहभागी झाले होते.