चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगलीत स्वकीयांचे कान पिळले, खासदार संजयकाकांना दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 03:56 PM2022-11-16T15:56:38+5:302022-11-16T15:58:55+5:30
पक्षीय काम न करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्याचे स्पष्ट संकेत दिले
सांगली : भाजपच्या संवाद मेळाव्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आव्हान देतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वकीयांचेही कान पिळले. पक्षीय कामात मागे पडलेल्या तासगाव मतदारसंघाबद्दल अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त करीत त्यांनी खासदार संजयकाका पाटील यांनाही इशारा दिला. त्यामुळे खासदारांबाबत वरिष्ठ स्तरावरही नाराजी असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
भाजपने गेल्या काही दिवसांत अनेक अभियान राबविली आहेत. ‘धन्यवाद मोदी’ या अभियानाच्या माध्यमातून लाभार्थी कुटुंबीयांच्या भेटीगाठी, बुथ सदस्यांची संख्या वाढविणे, कुटुंब पालकत्व योजना असे अनेक कार्यक्रम हाती घेतले आहेत. जिल्ह्यात सध्या विविध कार्यक्रमांचे ९० टक्के उद्दिष्ट भाजपने पूर्ण केले आहे.
शिल्लक १० टक्के काम हे तासगाव मतदारसंघातील आहे. कवठेमहांकाळमधूनही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. हे दोन्ही तालुके खासदार संजयकाका पाटील यांचे होमग्राऊंड मानले जातात. याठिकाणी कोणतेही पक्षीय काम करताना त्यांना विश्वासात घ्यावे लागते. तरीही हे दोन्ही तालुके अन्य तालुक्यांपेक्षा मागे आहेत.
खासदार पाटील यांनी कवठेमहांकाळ नगरपंचायतीत अध्यक्षपदाच्या निवडीत राष्ट्रवादीला धक्का दिल्यानंतर त्याचा गाजावाजा झाला. मात्र, पक्षीयस्तरावर दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात ते कमी पडल्याने त्याची पक्षांतर्गत चर्चा सुरु आहे.
भाजपच्या पदाधिकारी संवाद मेळाव्यात आ. गोपीचंद पडळकर यांनीही या गोष्टीवरुन खासदारांना चिमटा काढला. प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करणारे बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा त्यांच्या गावातील बुथचे प्रमुख आहेत, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
काहींना घरबसल्या तिकीट, काहींना घरचा रस्ता
बावनकुळे यांनी सभेत पक्षीय काम न करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्याचे स्पष्ट संकेत दिले. ज्या नेत्याकडे पक्षीय काम करण्याची क्षमता, लोकांशी सुसंवाद साधण्याची कला व ज्यांनी चांगले काम केले असेल त्यांना घरात बसून तिकीट मिळेल. मात्र, जे काम करणार नाहीत, अशा कोणत्याही मोठ्या नेत्याला घरी बसविले जाईल, असे त्यांनी सांगितले. याशिवाय सात मतदारसंघात विजयाची खात्री काही पदाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर बावनकुळे यांनी एक मतदारसंघ कोणता राहिला, असा सवाल करीत तिथेही विजय हवा, अशी सूचना दिली.