कृष्णा नदीच्या प्रदूषणास जयंत पाटील जबाबदार, भाजपचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार यांची टीका
By अशोक डोंबाळे | Published: March 21, 2023 07:32 PM2023-03-21T19:32:44+5:302023-03-21T19:33:21+5:30
सांगली : राजारामबापू साखर कारखान्याचे चार प्रकल्प, हुतात्मा, कृष्णासह ९ कारखान्यांचे मळीमिश्रीत पाणी, आष्टा, इस्लामपूर नगरपालिका आणि २९ गावांच्या ...
सांगली : राजारामबापू साखर कारखान्याचे चार प्रकल्प, हुतात्मा, कृष्णासह ९ कारखान्यांचे मळीमिश्रीत पाणी, आष्टा, इस्लामपूर नगरपालिका आणि २९ गावांच्या सांडपाण्यामुळे कृष्णा नदीचे पाणी दूषित झाल्याचे सिद्ध झाले आहे. या प्रदूषणाच्या प्रश्नावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काहीच बोलत नाहीत; परंतु सांगलीच्या स्वप्नपूर्तीच्या प्रदूषणाचा वाद विधानसभेत मांडून स्व. वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्यातील वाद उखरून काढला आहे, अशी टीका भाजपचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.
पृथ्वीराज पवार म्हणाले, हरित न्यायाधिकरणाच्या समितीचा अहवाल आम्ही जयंत पाटील यांना मुंबईत पोहोच करतो. त्यांनी हिंमत असेल तर तो जसाच्या तसा विधानसभेत वाचून दाखवावा. कृष्णा नदी प्रदूषण प्रकरणात माजी खासदार राजू शेट्टी हरित न्यायाधिकरणात गेले आहेत. स्वतंत्र भारत पक्षाच्या सुनील फराटे यांचीही याचिका दाखल आहे. रस्त्यावर, न्यायालयात लढा देऊन कृष्णा प्रदूषण मुक्तीचा सांगलीकरांचा ताकदीने प्रयत्न सुरू आहे. आम्ही या लढ्यात कुठल्या पक्षाचे, व्यक्तिगत वादाचे नावही घेत नाही. ही कृष्णाकाठच्या माणसांची लढाई आहे.
जयंत पाटील यांनी मात्र प्रदूषणाचा मुद्दा राजकीय केला. हरकत नाही; पण तुमचे का झाकून ठेवताय, नदी प्रदूषणाला सर्वाधिक जबाबदार त्यांच्याच संस्था आहेत, असे प्रदूषण विभागाचा अहवाल सांगतोय. त्यांना वेळोवेळी नोटिसा बजावल्या होत्या. सुधारणा न करता त्यांनी पुन्हा-पुन्हा नदी प्रदूषित केली आहे. राजारामबापू दूध संघ, राजारामबापू कारखाना, राजारामबापू डिस्टलरी, राजारामबापू कंट्री अँड फॉरेन लिकर या संस्था आणि आष्टा, इस्लामपूर पालिकांचे पाणी थेट नदीत सोडले जात असल्याचे अहवालात म्हटले आहे.
याशिवाय, हुतात्मा साखर कारखाना, हुतात्मा डिस्टलरी, कृष्णा कारखाना आणि डिस्टलरी यांचेही नाव अहवालात आहे. वसंतदादा आणि स्वप्नपूर्तीच्या बरोबरीने या दोषींवर कारवाईसाठी जयंत पाटील यांनी विधानसभेत बोलण्याची गरज आहे.
शनिवारी मानवी साखळी
कृष्णा नदीच्या प्रश्नावर जनतेमध्ये जनजागृती करण्यासह प्रदूषण करणाऱ्या साखर कारखान्यांचा निषेध करण्यासाठी शनिवार, दि. २५ मार्च रोजी सांगलीत कृष्णा घाटावर मानवी साखळी करण्यात येणार आहे. यातूनही शासनास जाग आली नाही तर मुंबईत आझाद मैदानावर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असेही पृथ्वीराज पवार यांनी सांगितले.
जिल्हा बँक पदाधिकारी, अधिकाऱ्यांवर कारवाई करा
पृथ्वीराज पवार म्हणाले, स्वप्नपूर्ती शुगर्सने डिस्टिलरी चालवल्याचे प्रकरण तेवढेच गंभीर आहे. जिल्हा बँकेच्या ताब्यात वसंतदादा कारखान्याची डिस्टिलरी होती आणि स्वप्नपूर्तीने परस्पर ती चालवली आणि बँक अधिकारी, पदाधिकाऱ्यांना त्याचा थांगपत्ता लागत नाही, हे पटणारे नाही. त्यासाठी विविध परवाने, वीज कनेक्शन, पाणी कनेक्शन घेतले गेले. त्याचे पैसे कुठे गेले, हे आज तुम्ही विचारत आहात. जर ही डिस्टिलरी जिल्हा बँकेच्या ताब्यात आहे तर त्या पैशांना, त्या माध्यमातून झालेल्या कृष्णा प्रदूषणाला जिल्हा बँकेचे अधिकारी आणि पदाधिकारी तेवढेच जबाबदार आहेत. त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे.
वर्षानुवर्षे मासे मेले, जयंतराव आज बोलले
पृथ्वीराज पवार म्हणाले, दि. २१ जुलै २०२२ ला मसुचीवाडी, १३ जुलै २०२२ ला नागठाणे ते भिलवडी, ३ फेब्रुवारी २०२१ ला बहे बेट, १५ जुलै २०१९ ला पलूस व सांगली, ३० मार्च २०१५ ला तुपारी बंधारा, वारणा नदीत १७ जानेवारी २०२१ ला दूधगाव, १४ जुलै २०२१ ला मिरज कृष्णा घाट येथे मासे मेले, मगर मेली. त्यावेळी जयंत पाटील यांनी विधानसभेत चर्चा किंवा लक्षवेधी का मांडली नाही?, त्यांनी कृष्णा नदी प्रदूषणावर व्यापक भूमिका मांडून प्रदूषण मुक्तीसाठी सरकारने योजना हाती घेण्याची मागणी केली असती तर आम्ही त्याचे स्वागत केले असते.