राष्ट्रवादी नगरसेविकेच्या समर्थनार्थ भाजप रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:36 AM2020-12-30T04:36:52+5:302020-12-30T04:36:52+5:30
सांगली : राष्ट्रवादीच्या नगरसेविका स्वाती पारधी यांनी पदाधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून पदाचा राजीनामा दिला. आदिवासी प्रवर्गातील नगरसेविकेवर होणाऱ्या ...
सांगली : राष्ट्रवादीच्या नगरसेविका स्वाती पारधी यांनी पदाधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून पदाचा राजीनामा दिला. आदिवासी प्रवर्गातील नगरसेविकेवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ भाजपच्या भटके-विमुक्त जाती मोर्चाच्या वतीने सांगलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादीच्या निषेधाच्या घोषणा देत निदर्शने करण्यात आली. राष्ट्रवादी नगरसेविकेच्या समर्थनार्थ भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने हे आंदोलन चर्चेचा विषय ठरले.
संघटन सरचिटणीस दीपक माने यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी माने म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षात आदिवासी व मागासवर्गीय समाजातील कार्यकर्ते व नगरसेवकांवर सातत्याने अन्याय होत आहे. या वादाला कंटाळून नगरसेवक योगेंद्र थोरात व नगरसेविका स्वाती पारधी यांनी मिरज विभागीय कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते. याबाबत पक्षाच्या नेत्यांकडे तक्रार करूनही काहीच उपयोग झाला नाही. नगरसेवक थोरात यांनीही सातत्याने अन्याय होत असल्याचे सांगितले आहे. भाजपवर जातीयवादी असल्याचा आरोप करणारा राष्ट्रवादी हाच खरा जातीयवादी आहे. त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करतो, असे सांगितले. यावेळी राजू जाधव, राहुल माने, ज्योती कांबळे, गीता पवार, संगीता जाधव, नीलेश निकम, अमित भोसले, राजू मद्रासी यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.