सांगलीत सभापतिपदावरून भाजपमध्ये संघर्ष : संदीप आवटी यांचे नाव आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 11:45 PM2019-09-25T23:45:57+5:302019-09-25T23:46:54+5:30
बुधवारी सायंकाळी अचानकच मिरजेचे संदीप आवटी यांचे नाव समोर आले. भाजपच्या कोअर कमिटीने आवटी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची कुजबूज भाजप नगरसेवकांत सुरू झाली.
सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदावरून भाजपमध्ये संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. गुरुवारी सभापतिपदासाठी अर्ज दाखल केले जाणार आहेत. दरम्यान, बुधवारी सायंकाळी ऐनवेळी मिरजेचे संदीप आवटी यांचे नाव आघाडीवर आल्याने इच्छुक गणेश माळी व गजानन मगदूम यांची धाकधूक वाढली आहे. आवटी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यास या दोघांच्या भूमिकेकडेही लक्ष लागणार आहे.
महापालिकेच्या स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती, समाजकल्याण समितीच्या सभापतिपदासाठी गुरुवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. या तीनही समित्यांवर सत्ताधारी भाजपचे वर्चस्व आहे. यापैकी स्थायी सभापतिपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती. सभापतीसाठी मिरजेतून गणेश माळी व कुपवाडचे गजानन मगदूम यांची नावे आघाडीवर होती. त्यात पहिला सभापती सांगलीचा झाल्याने यंदा मिरज अथवा कुपवाडला संधी मिळेल, अशी चर्चा होती.
मिरजेतून गणेश माळी यांनी जोरदार फिल्ंिडग लावली होती. सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, महापालिकेतील नेते शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील यांच्यासह प्रमुख नेतेमंडळींची भेट घेऊन सभापतिपदावर दावा केला होता. त्यांना संधी मिळेल, अशीच चर्चा सुरू होती. त्यात कुपवाडचे गजानन मगदूम यांनीही मोर्चेबांधणी केली होती. कुपवाडला धनपाल खोत वगळता एकालाही सभापतिपदाची संधी मिळालेली नाही. त्यामुळे मगदूम यांनी सभापतीसाठी जोर धरला होता. त्यांना शेखर इनामदार यांचे पाठबळ होते.
बुधवारी सायंकाळी अचानकच मिरजेचे संदीप आवटी यांचे नाव समोर आले. भाजपच्या कोअर कमिटीने आवटी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची कुजबूज भाजप नगरसेवकांत सुरू झाली. आवटी यांनीही सभापतिपदासाठी इच्छा व्यक्त केली असली तरी, या गटाचा डोळा महापौरपदावर होता. त्यामुळे आवटी गट फार जोर करणार नाही, असा कयास लावला जात होता.
पण अखेरच्या क्षणी संदीप आवटी यांचे नाव चर्चेत आल्याने इतर इच्छुकांची धाकधुक वाढली. रात्री उशिरापर्यंत इच्छुकांनी नेते व कोअर कमिटी सदस्यांच्या भेटीगाठी व दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले होते. आवटी यांचे नाव जाहीर झाल्यास माळी व मगदूम यांच्या भूमिकेकडेही लक्ष लागले आहे.
नेत्यांनी हात झटकले
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यात इच्छुक नगरसेवकांची नाराजी नको, म्हणून नेत्यांनी सभापती पदाच्या निवडीपासून दूर राहणेच पसंत केले आहे. मंत्री सुरेश खाडे व आ. गाडगीळ यांनी निवडीची जबाबदारी कोअर कमिटीवर सोपविल्याचे समजते. निवडणुकीत आणखी नाराजी ओढवून घेण्याची मानसिकता नेत्यांची नाही.
नाराजांवर विरोधकांचे लक्ष
स्थायी समितीत भाजपचे ९ व काँग्रेस-राष्ट्रवादीचे ७ सदस्य आहेत. भाजपमध्ये सभापती पदावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. इच्छुकांच्या हालचालींवर काँग्रेस व राष्ट्रवादीचे बारकाईने लक्ष आहे. सभापती पदाची संधी न मिळाल्यास फाटाफूट होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे नाराजांना सोबत घेऊन स्थायीची सूत्रे हाती घेण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीनेही मोर्चेबांधणी केल्याचे समजते.