Congress Jan Sangharsh Yatra भाजपकडून सत्तेसाठी साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर : अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 10:47 PM2018-09-02T22:47:34+5:302018-09-02T22:54:00+5:30
केंद्र व राज्यातील भाजप सरकार साम, दाम, दंड, भेद यांचा वापर करून सत्तेसाठी वट्टेल ते करण्यासाठी सरसावले आहे. त्यामुळे जनमत आमच्या बाजूला असूनही आमचे यश आम्हाला मिळू न देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत,
सांगली : केंद्र व राज्यातील भाजप सरकार साम, दाम, दंड, भेद यांचा वापर करून सत्तेसाठी वट्टेल ते करण्यासाठी सरसावले आहे. त्यामुळे जनमत आमच्या बाजूला असूनही आमचे यश आम्हाला मिळू न देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रविवारी केली.
जनसंघर्ष यात्रेनिमित्त सांगलीत आलेल्या काँग्रेस नेत्यांनी रविवारी सकाळी येथील वसंतदादांच्या स्मारकस्थळी भेट देऊन अभिवादन केले. यावेळी अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, हर्षवर्धन पाटील, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम, प्रकाश सातपुते, पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील आदी उपस्थित होते.
यानंतर पत्रकारांशी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, वसंतदादांचे विचार नेहमीच आम्हाला प्रेरणा देणारे ठरले आहेत. प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करीत लोकांसाठी कार्यरत राहण्याची त्यांची कार्यपद्धती स्फूर्तिदायी आहे. त्यामुळे आम्ही काँग्रेसजन आज त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी याठिकाणी आलो आहोत. संपूर्ण राज्यातील जनता काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला प्रतिसाद देत आहे. सांगली जिल्ह्यातही वसंतदादांवर व त्यांच्या विचारावर प्रेम करणारे लोक आहेत. त्यामुळे येथील जनताही आमच्या पाठीशी राहील, याचा विश्वास आहे.
भाजप सरकार सत्तेसाठी वाट्टेल त्या गोष्टी करीत आहे. सत्ता उपभोगताना त्यांनी कधीही जनतेच्या हितासाठी काम केले नाही. राज्यातील व देशातील जनता अनेक प्रश्नांना सामोरी जात आहे. असेच चालत राहिले, तर सामान्य माणसाचे जगणे मुश्किल होईल. त्यामुळेच सरकारच्या चुकीच्या धोरणांची चर्चा करतानाच, लोकांशी संवाद साधण्याचे कामही आम्ही या यात्रेच्या निमित्ताने करीत आहोत. त्यास प्रतिसाद मिळत आहे.
आरक्षणाबाबत सरकारकडून दिशाभूल
जत : चार वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणूक प्रचारात धनगर समाजाला आरक्षण देतो, असा शब्द देऊनही भाजपने तो पाळला नाही. मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली आहेत. सर्वसामान्यांना भूलथापा देऊन सत्तेवर आलेले हे सरकार बदलण्याची वेळ आता आली आहे. जत विधानसभेची जागा काँग्रेसच्या पारड्यात पाडणार असून त्यासाठी वैयक्तिक लक्ष देणार आहे, असे प्रतिपादन प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी केले. जत येथे तालुका काँग्रेसतर्फे जनसंघर्ष यात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर दुय्यम बाजार आवार परिसरात आयोजित जाहीर सभेत चव्हाण बोलत होते.