झेडपी पदाधिकारी बदलाबाबत भाजप सावध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:19 AM2021-01-10T04:19:27+5:302021-01-10T04:19:27+5:30
भाजपने मित्रपक्षांच्या मदतीने जिल्हा परिषदेत कमळ फुलविले आहे. चार वर्षे सत्ताही टिकविली असून एक वर्ष शिल्लक आहे. पहिल्या तीन ...
भाजपने मित्रपक्षांच्या मदतीने जिल्हा परिषदेत कमळ फुलविले आहे. चार वर्षे सत्ताही टिकविली असून एक वर्ष शिल्लक आहे. पहिल्या तीन वर्षांत अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने उत्तम कामगिरी केली. देशात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याचा त्यांना विकासकामांसाठी फायदा झाला.
उर्वरित दोन वर्षांच्या कालावधीसाठी ओबीसी महिलेसाठी अध्यक्षपद आरक्षित होते. जानेवारी २०२० मध्ये या पदावर मिरज तालुक्यातून प्राजक्ता कोरे, सरिता कोरबू आणि पलूस तालुक्यातून अश्विनी पाटील इच्छुक होत्या. प्राजक्ता कोरे यांनी अध्यक्षपद पदरात पाडून घेतले. अन्य सभापतिपदासाठीही भाजप आणि मित्रपक्षांतील सदस्य इच्छुक होते. विद्यमान पदाधिकाऱ्यांना वर्षासाठी संधी दिल्यानंतर उर्वरित वर्षासाठी संधी देऊ, असे आश्वासन देऊन भाजपच्या कोअर कमिटीने त्यांना शांत केले होते. विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल गुरुवारी संपला; पण, सध्या ग्रामपंचायत निवडणुका असल्यामुळे भाजपच्या नेत्यांनी पदाधिकारी बदलाबाबत निर्णय घेतलेला नाही.
भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख याबाबत म्हणाले की, ठरल्याप्रमाणे जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदल करावा, याबाबतचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठविला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर जिल्हा कोअर कमिटीची बैठक आहे. त्यामध्ये पदाधिकारी बदलावर ठोस निर्णय होईल. इच्छुक सदस्यांनाही संधी मिळाली पाहिजे, अशीच आमची भूमिका आहे.
चौकट
आघाडीला गरज बहुमताची
जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांकडे भाजपचे २५, रयत विकास आघाडीचे चार, माजी मंत्री अजितराव घोरपडे समर्थक दोन आणि शिवसेनेचे तीन अशी ३४ सदस्य संख्या होती. राष्ट्रवादीकडे अपक्षासह १५, काँग्रेसकडे नऊ आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एक अशी २५ सदस्यसंख्या आहे. आघाडीच्या नेत्यांनी बदलासाठी प्रयत्न केले नाहीत. बदलाचा निर्णय झाला तर ३४ सदस्य भाजपबरोबर राहतील का, याची चाचपणी भाजपचे नेते करीत आहेत.