सांगली जिल्ह्यातील सातही बाजार समित्यांमध्ये भाजप लढणार स्वबळावरच
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 04:44 PM2023-04-13T16:44:19+5:302023-04-13T16:44:47+5:30
बैठकीस प्रमुख नेते गैरहजर
सांगली : जिल्ह्यातील सातही बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रात भाजपला अनुकूल वातावरण आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजप स्वबळावरच निवडणुका लढणार आहे. यामध्ये काही मित्र पक्ष आणि त्यांचे नेते, पदाधिकारी सहभागी झाले तर त्यांनाही बरोबर घेणार आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी बुधवारी दिली.
बाजार समित्यांच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची सांगलीत बैठक झाली. या बैठकीनंतर मंत्री खाडे बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील, माजी आमदार दिनकर पाटील यांच्यासह इच्छुक उमेदवार व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री खाडे म्हणाले की, जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात भाजपच्या मतदारांची संख्या वाढली आहे. सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी सातही बाजार समित्यांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची भूमिका माझ्याकडे व्यक्त केली होती. त्यानुसार बुधवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविली होती. या बैठकीस काही नेते गैरहजर होते, पण, त्यांच्याशी फोनवरून बोलणे झाले आहे. सर्वच भाजप नेत्यांनी बाजार समित्यांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची भूमिका मांडली आहे. त्यानुसार बाजार समित्यांच्या निवडणुका भाजप मित्र पक्ष व संघटनांच्या सहकार्याने लढणार आहे.
प्रमुख नेते गैरहजर, पुन्हा शनिवारी बैठक
बाजार समित्यांच्या निवडणुकाबाबत बोलविलेल्या बैठकीस भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आ. सुधीर गाडगीळ, आ. गोपीचंद पडळकर, माजी आ. विलासराव जगताप, माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख, सत्यजित देशमुख आदी प्रमुख नेते गैरहजर होते. त्यामुळे पुन्हा शनिवार, दि. १५ रोजी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविली आहे, अशी माहिती मंत्री खाडे यांनी दिली.
शिंदे गटालाही संधी
- भाजपबरोबर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा गट सहभागी आहे. जिल्ह्यातील सात बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्येही शिंदे गटाला संधी देण्यात येणार असून त्यांच्याशी चर्चा करणार आहे.
- अन्य मित्र पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनही बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांनाही बरोबर घेण्यात येणार आहे, असेही मंत्री खाडे म्हणाले.