धनगर समाजाला भाजपच आरक्षण देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:03 AM2019-04-20T00:03:27+5:302019-04-20T00:03:31+5:30

सांगली : आधीचे सरकार वाईट होते, असे नाही. पण त्यांनी धनगर समाजाला न्याय दिला नाही. राज्यातील भाजप सरकारने मात्र ...

BJP will give reservation to Dhangar community | धनगर समाजाला भाजपच आरक्षण देणार

धनगर समाजाला भाजपच आरक्षण देणार

Next

सांगली : आधीचे सरकार वाईट होते, असे नाही. पण त्यांनी धनगर समाजाला न्याय दिला नाही. राज्यातील भाजप सरकारने मात्र धनगर आरक्षणाबाबत ठोस पावले उचलली आहेत. न्यायालयातही प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. धनगर आरक्षणाची सुरुवात आम्हीच केली आणि समाजाचे भलेही आम्हीच करणार, असा दावा राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते तथा राज्याचे दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकार बैठकीत केला.
देशाला सक्षम नेतृत्वाची गरज आहे. त्यासाठी नरेंद्र मोदी यांना रासपने पाठिंबा दिल्याचे सांगून जानकर म्हणाले की, गत लोकसभेवेळी एक जागा रासपला दिली होती, तर विधानसभेच्या सहा जागा मिळाल्या होत्या. यंदाही आम्ही बारामती, माढा मतदारसंघाची मागणी केली होती. युद्धात आम्ही हरलो असलो, तरी तहात जिंकलो आहे. पक्षाचे दोन आमदार, ९८ जिल्हा परिषद सदस्य, ३ नगराध्यक्ष आहेत. पुढील विधानसभेवेळी जागा वाढवून घेऊ.
मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत धनगर आरक्षण देण्याची ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्याबाबत जानकर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसने धनगर आरक्षणाबाबत मोर्चा काढला होता. तेव्हा समाजातील तरुणांचे जीव वाचविण्यासाठी मी, फडणवीस, पंकजा मुंडे आंदोलकांना भेटलो, तेव्हा असे आश्वासन दिले होते. पण चळवळीत बोलणे वेगळे व संसदीय कार्यपद्धती वेगळी असते, याची जाणीव सत्तेत आल्यानंतर झाली. मराठा आरक्षणाप्रमाणे धनगर आरक्षणही लटकू नये, यासाठी सर्व अहवाल आल्यानंतरच निर्णय घेण्याचे ठरले. त्यानुसार आता टीसचा अहवाल मिळाला आहे. सरकारनेही न्यायालयात अनुकूल प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यामुळे धनगर समाजाला भाजपच आरक्षण देणार यात शंका नाही.
भाजप सरकारने आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला सामाजिक, शैक्षणिक आरक्षण दिले आहे. राजकीय आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. धनगर समाजासाठी स्वतंत्र बजेट दिले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळीपालन महामंडळाला मी ५० कोटीचा निधी दिला. आता सरकारकडून एक हजार कोटीची तरतूद केली जाणार आहे, असेही जानकर म्हणाले.

मला गुलाल नाही, तरीही समाधान
लोकसभेच्या तीन ते चार निवडणुका मी लढविल्या. अगदी सांगलीतूनही निवडणूक लढलो आहे. पण मला कधीच गुलाल लागला नसला तरी, नाराज नाही. समाजाला प्रकाश देण्याचे काम आपण केल्याचे जानकर म्हणाले.
पडळकरांचा विषय संपला
गोपीचंद पडळकर यांच्याविषयी विचारता ते म्हणाले की, ते माझ्यासोबत होते, तेव्हा कौतुक करीत. आता विरोधात गेल्यावर टीका करणारच. रासपमधून गेल्यानंतर माझ्यासाठी त्यांचा विषय संपला आहे. त्यांच्यावर अधिक बोलणे योग्य नाही.

Web Title: BJP will give reservation to Dhangar community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.