भाजप एक उदारमतवादी पक्ष, पक्षाचा आमदार नाही तेथेही निधी देणार - कामगारमंत्री सुरेश खाडे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 12:37 PM2022-10-04T12:37:31+5:302022-10-04T13:04:01+5:30
भाजप एक उदारमतवादी पक्ष असून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय दिला जातो
पेठ : पालकमंत्री या नात्याने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पक्षाचे आमदार नसेल त्या ठिकाणी भरीव निधी दिला जाईल. भाजप एक उदारमतवादी पक्ष असून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय दिला जातो, असे प्रतिपादन कामगारमंत्री सुरेश खाडे यांनी केले.
पेठ (ता. वाळवा) येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याचे भूमिपूजन आणि ग्रामसचिवालय नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. खासदार धैर्यशील माने, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, सी. बी. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, युवा नेते सम्राट महाडिक प्रमुख उपस्थित होते.
सदाभाऊ खोत म्हणाले, नानासाहेब महाडिक यांच्या पावलावर पाऊल ठेवून राहुल महाडिक आणि सम्राट महाडिक हे करीत आहेत. शेतकऱ्याच्या उसाला एकरकमी द्या तसेच कारखान्यांमधील हवाई अंतर कमी करा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिल्लक राहणार नाही.
सम्राट महाडिक म्हणाले, आम्ही समाजोपयोगी योजना आणल्या की पहिल्या पालकमंत्र्याचा त्रास ठरलेला असायचा. तरीसुद्धा आम्ही विकासकामात कमी पडलो नाही.
सरपंच मीनाक्षी महाडिक यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे, राजाराम गरूड, सी. बी. पाटील. वसुधा दाभोळे, राहुल पाटील, शकुंतला शेटे, डॉ. सचिन पाटील, मोहनराव मदने, धनपाल माळी, कृष्णात पाटील, शंकर पाटील, अमीर ढगे, दीपक कदम, कपिल ओसवाल उपस्थित होते. जगन्नाथ माळी यांनी स्वागत केले. उपसरपंच चंद्रकांत पवार यांनी आभार मानले.