Sangli: इस्लामपुरात पोलिस निरीक्षकांच्या बदलीसाठी भाजप कार्यकर्ते आक्रमक, आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिस-कार्यकर्त्यांमध्ये झटापट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 13:55 IST2025-03-24T13:54:22+5:302025-03-24T13:55:53+5:30

युनूस शेख इस्लामपूर : इस्लामपूर शहर आणि परिसरात खुलेआम अवैध धंदे सुरू असुन त्याला पोलिस अधिकाऱ्यांचेच पाठबळ आहे असा ...

BJP workers aggressively demanding transfer of police inspector in Islampur, clash between police and workers | Sangli: इस्लामपुरात पोलिस निरीक्षकांच्या बदलीसाठी भाजप कार्यकर्ते आक्रमक, आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिस-कार्यकर्त्यांमध्ये झटापट

Sangli: इस्लामपुरात पोलिस निरीक्षकांच्या बदलीसाठी भाजप कार्यकर्ते आक्रमक, आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिस-कार्यकर्त्यांमध्ये झटापट

युनूस शेख

इस्लामपूर : इस्लामपूर शहर आणि परिसरात खुलेआम अवैध धंदे सुरू असुन त्याला पोलिस अधिकाऱ्यांचेच पाठबळ आहे असा थेट आरोप करत येथील पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांच्या बदलीसाठी आक्रमक झालेल्या भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या दारात अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. एकमेकांशी झटापट करण्यापर्यंत हा राडा झाला. जवळपास तासभर हे आंदोलन सुरू होते.

गेल्या पंधरा दिवसांपासून भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि माजी नगरसेवक विक्रम पाटील यांनी शहरात खुलेआम अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप करत मटका जुगाराच्या चिठया जोडून जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन पाठवले होते. त्यामध्ये २४ मार्चपूर्वी निरीक्षक हारुगडे यांची बदली करावी अशी मागणी केली होती. बदली न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा आशा पवार यांनी दिला होता.

त्यामुळे विक्रम पाटील यांच्यासह महिला कार्यकर्त्या आशा पवार यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारात जमल्या होत्या. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महिला पोलिसांची संख्या मोठी होती. भाजपच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या होत्या. त्यांच्याकडून हारुगडे यांच्या बदलीचा आग्रह धरला जात होता. वरीष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी यावे अशी मागणी केली जात होती. याचवेळी अंगाला हात लावायचा नाही असा दम महिला कार्यकर्त्यांकडून टाकला जात होता. त्यामुळे गोंधळाचे वातावरण झाले होते.

या तापलेल्या आणि गोंधळाच्या वातावरणातच कार्यकर्त्यांनी आपल्या अंगावर रॉकेल ओतून घेतल्यावर पुन्हा पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या झटापटीला सुरुवात झाली. पोलिसांनी कॅन हस्तगत करून अनर्थ टाळला. यावेळी वातावरण तणावपूर्ण बनले होते. शेवटी पोलिसांनी बळाचा वापर करत सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले.

शहरात बेकायदेशीरपणे अवैध धंदे सुरू 

इस्लामपूर शहरात बेकायदेशीरपणे अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप विक्रम पाटील यांनी केल्यावर पोलिस निरीक्षक हारुगडे अवैध धंदे सुरू नाहीत. कुठे सुरू असल्यास नागरिकांनी आमच्याशी संपर्क साधावा, कारवाई केली जाईल असे जाहीर केले होते. त्यामुळे विक्रम पाटील हे संतप्त झाले होते. त्यानंतर मात्र पोलिसांकडून चोरटी दारू विक्री करणारे, मटका जुगार घेणाऱ्या व्यक्तिंवर कारवाई करण्यास सुरुवात झाल्याने हे धंदे सुरू असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळेच भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले.

Web Title: BJP workers aggressively demanding transfer of police inspector in Islampur, clash between police and workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.