निशिकांत पाटील धमकी प्रकरणावरून भाजपचे कार्यकर्ते संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:31 AM2021-08-12T04:31:25+5:302021-08-12T04:31:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : शहराचे नगराध्यक्ष व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भाेसले-पाटील यांना व्हॉटस्ॲप संदेशाद्वारे आलेल्या धमकीवरून तालुक्यातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शहराचे नगराध्यक्ष व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भाेसले-पाटील यांना व्हॉटस्ॲप संदेशाद्वारे आलेल्या धमकीवरून तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तालुक्याच्या विविध गावांतून धमकी देणाऱ्याच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून या घटनेचा निषेध करण्यात आला.
येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांना निवेदन देत या धमकी प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. दीड महिन्यापासून या प्रकरणावर पोलिसांकडून कोणतीही कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. धमकीच्या संदेशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्याबद्दलही अपशब्द वापरलेले आहेत. भाजपचे कार्यकर्ते असल्या विकृत धमक्यांना भीक घालणार नाहीत. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा सरचिटणीस संजय हवलदार यांनी दिला आहे.
यावेळी अशोक खोत, गौरव खेतमर, सुभाष शिंगण, प्रवीण परीट, भास्कर मोरे, सतेज पाटील, अक्षय कोळेकर, फिरोज पटेल, विकास परीट, फिरोज मुंडे उपस्थित होते.
दरम्यान, धमकीचे पडसाद गावोगावी उमटले आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी धमकी देणाऱ्याच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून या घटनेचा निषेध केला.