आमदार-खासदारांच्या संघर्षात मिरजेत भाजपची नामुष्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 11:50 PM2019-02-19T23:50:07+5:302019-02-19T23:50:13+5:30
मिरज : खासदार संजय पाटील व आमदार सुरेश खाडे यांच्यातील सत्तासंघर्षामुळे मिरज पंचायत समितीत सत्ताधारी भाजप अडचणीत आल्याचे चित्र ...
मिरज : खासदार संजय पाटील व आमदार सुरेश खाडे यांच्यातील सत्तासंघर्षामुळे मिरज पंचायत समितीत सत्ताधारी भाजप अडचणीत आल्याचे चित्र आहे. विरोधकांच्या खेळीमुळे उपसभापतीपदी बंडखोराच्या निवडीची नामुष्की पंचायत समितीत प्रथमच सत्तेवर आलेल्या भाजपवर ओढवली आहे. पंचायत समितीत बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे सहा महिन्यांनंतर होणाऱ्या सभापती निवडीवेळी भाजपला आव्हान देण्याच्या तयारीत विरोधक आहेत.
मिरज पंचायत समितीत भाजपचे दहा, काँग्रेस-राष्ट्रवादी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दहा सदस्य आहेत. शालन भोई व राहुल सकळे या दोन अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. पंचायत समितीत सत्तेवर आल्यापासून खासदार संजय पाटील व सुरेश खाडे यांच्या समर्थकांत सभापती व उपसभापतीपदी निवडीसाठी रस्सीखेच सुरु आहे. खाडेसमर्थक जनाबाई पाटील यांची सभापतीपदी निवड झाल्यानंतर खासदार संजय पाटील यांनी आमदार खाडेसमर्थक अशोक मोहिते यांना डावलृून काकासाहेब धामणे या आपल्या समर्थकाची उपसभापतीपदी वर्णी लावली.
खासदार समर्थक शालन भोई यांची सभापतीपदी निवड झाल्यानंतर सांगली-मिरजेतील आमदारांच्या मान्यतेने राहुल सकळे यांचे नाव सभापतीपदासाठी निश्चित करण्यात आले. मात्र खासदारांच्या तटस्थ भूमिकेमुळे विरोधकांच्या मदतीने भाजप बंडखोर विक्रम पाटील यांची उपसभापतीपदी निवड झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना या विरोधकांनी एकत्र येत बंडखोरांची निवड करण्यास भाग पाडल्याने सत्ताधारी भाजपला धक्का बसला आहे. विक्रम पाटील यांच्या बंडखोरीमुळे पंचायत समितीत भाजप व विरोधकांची संख्या आता समान झाली आहे. मिरज पूर्व भागातील आणखी एक सदस्य पक्षावर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे सहा महिन्यानंतर सभापती निवडीवेळीही विरोधकांचा वरचष्मा राहणार आहे.
सत्ताधारी भाजपमध्ये पडलेल्या फुटीमुळे पंचायत समितीतील राजकीय समीकरणे बदलली आहेत. भाजपचे बंडखोर आता विरोधकांसोबत भाजप नेत्यांना आव्हान देत आहेत. चार महिन्यांपूर्वी झालेल्या सभापती निवडीवेळीही विरोधकांनी एकत्र येत भाजप बंडखोराला निवडून आणण्याची तयारी केली होती, मात्र खासदार संजय पाटील यांनी हस्तक्षेप करीत विरोधकांना समजावले होते. उपसभापती निवडीवेळी भाजपचे खासदार व आमदार पंचायत समितीकडे फिरकले नसल्याची चर्चा होती. आमदार-खासदारांच्या राजकीय साठमारीमुळे सत्ताधारी भाजपला खिंडार पडून भाजपच्या सत्तेला आव्हान देण्यात विरोधक यशस्वी ठरल्याचे चित्र आहे. पंचायत समितीत विरोधकांची मोट बांधणारे काँग्रेसचे गटनेते अनिल आमटवणे यांची खासदार संजय पाटील यांच्याशी सलगी असल्याने स्वपक्षीय नेते पंचायत समितीतील सत्ता अस्थिर करीत असल्याचा आरोप आमदारसमर्थक करीत आहेत. पंचायत समितीत खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे या नेत्यांतील संघर्षामुळे विरोधकांचे मात्र फावले आहे.
सत्ताधारी सदस्यांची विरोधकांशी सलगी
पंचायत समितीत मिरज पूर्व भागातून निवडून आलेले भाजपचे बहुतांशी सदस्य पूर्वाश्रमीचे काँग्रेस व राष्ट्रवादीचे असल्याने त्यांची विरोधकांशी सलगी आहे. भाजपची सत्ता असतानाही मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव फेटाळण्यासह शासनाविरोधातही पंचायत समिती सभेत ठराव करण्यात आले आहेत.