भाजप खासदारांचे सर्वपक्षीय प्रेम
By admin | Published: July 2, 2015 11:38 PM2015-07-02T23:38:18+5:302015-07-02T23:38:18+5:30
महापालिकेत अडीच कोटीची कामे : यादी नियोजन विभागाकडे
सांगली : सांगली जिल्ह्यात भाजप- राष्ट्रवादीची छुपी युती असल्याचा आरोप नेहमीच होत असतो. नेतेमंडळी उघडरित्या युती मान्य करीत नसले तरी, अनेकदा त्यांच्या कृतीतून याचा प्रत्यय येत असतो. नुकतेच जिल्हा नियोजन समितीकडून महापालिका हद्दीतील विविध विकासकामांसाठी खासदार संजय पाटील यांनी अडीच कोटीचा निधी मंजूर केला. या निधीतून सर्वाधिक कामे राष्ट्रवादी व भाजपनिष्ठ नगरसेवकांच्या प्रभागात होणार असली तरी, काँग्रेसच्या नगरसेवकांवरही अपेक्षेपेक्षा अधिक कृपादृष्टी झाली आहे.
महापालिका हद्दीत रस्ते खडीकरण, गटार, हॉटमिक्स रस्ते, सामाजिक सभागृह, सांस्कृतिक हॉल अशा ३० कामांची यादी खासदार पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीकडे दिली आहे. यातील सर्वाधिक कामे राष्ट्रवादीशी निगडीत नगरसेवकांच्या प्रभागातील आहेत. विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, विष्णू माने, युवराज गायकवाड, महेंद्र सावंत, राजू गवळी यांच्या प्रभागात डांबरीकरण, खडीकरणाच्या कामाचा समावेश केला आहे. तर भाजपनिष्ठ युवराज बावडेकर, वैशाली कोरे, धनपाल खोत, सुलोचना खोत यांनाही निधी देण्यात आला आहे.
काँग्रेसमधील माजी उपमहापौर प्रशांत मजलेकर, अलका पवार, हारूण शिकलगार या बड्या नगरसेवकांसह सांगलीवाडीतील कामांचा यादीत समावेश आहे. तसेच शिवराज बोळाज, बाळू गोंधळी यांच्या प्रभागात निधी दिला आहे. राष्ट्रवादी व भाजपनिष्ठ नगरसेवकांच्या वाट्याला दीड कोटीची कामे आली आहेत, तर कॉँग्रेसच्या वाट्याला एक कोटीचा निधी मिळाला आहे. (प्रतिनिधी)
गुंठेवारीसाठी २५ लाख
खासदार पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी शहरातील गुंठेवारी भागाची पाहणी केली. या भागातील नागरिकांनी त्यांच्यासमोर तक्रारींचा पाढाच वाचला. त्याची दखल घेऊन खा. पाटील यांनी तातडीने गुंठेवारी भागात मुरूम टाकण्यासाठी खासदार निधीतील २५ लाख रुपये मंजूर केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना हा निधी पालिकेकडे वर्ग करण्याची सूचनाही केल्याचे सांगितले.